ट्रक व कारच्या अपघातात एकाचा मृत्यू

चांदूर रेल्वे - अमरावती मार्गावरील घटना

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
चांदूर रेल्वे, 
truck-and-car-accidents : चांदूर रेल्वेपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर चांदूर रेल्वे—अमरावती मार्गावरील बासलापूर नजीक असलेल्या मच्छी तलावाजवळ रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास ट्रक व कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला.
 
 
kl
 
मृत व्यक्तीचे नाव अमित गजाननराव पांडे (वय ४५, रा. अमरावती) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमित पांडे हे आपल्या चारचाकी वाहनाने (कार क्र. एमएच ०४ ईएक्स ६६९४ चांदूर रेल्वेकडून अमरावतीकडे जात होते. यावेळी समोरून येणार्‍या ट्रक क्र. एमएच २७ बीक्स ९४९८) व कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार पूर्णपणे चकनाचूर झाली आणि चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर अडथळा ठरलेली कार बाजूला करण्यात आली. तसेच कारमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना मदत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस कर्मचारी जगदीश राठोड व अतुल शिरसाट यांनी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलिस करीत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.