तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Nagar Parishad election नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर जावे लागण्यामागील कारणांचा सखोल आढावा घेण्यासाठी रविवार, 11 जानेवारी रोजी भाजपाच्या निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात निष्ठावंतांना डावलण्याची चूक महागात पडल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाचे स्पष्ट मंथन करताना निष्ठावंत, कॅडर बेस कार्यकर्त्यांना डावलून उपरे व नवगतांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचा ठाम निष्कर्ष काढण्यात आला. याच चुकीमुळे भाजपा नगरपरिषदेत सत्ता स्थापनेपासून दूर ढकलल्या गेल्याची तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यापुढे पक्षश्रेष्ठींनी जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून कोणतेही राजकीय निर्णय घेऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका बैठकीत मांडण्यात आली. विशेषतः स्वीकृत नगरसेवकांची निवड निष्ठावंत कार्यकर्त्यांमधूनच करण्यात यावी, पाच अशासकीय सदस्यांची नावे जुन्या कार्यकर्त्यांतून पाठवावीत, शासकीय व निमशासकीय समित्यांवर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे ठराव एकमताने पारित करण्यात आले.
या सर्व मागण्या व भावना आमदार किसन वानखेडे व माजी आमदार नामदेव ससाने यांच्याशी प्रत्यक्ष भेटून मांडण्यात आल्या असून, राज्य व जिल्हास्तर वरिष्ठ नेतृत्वाकडे याचा ठोस पाठपुरावा करण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे.बैठकीतून, नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा होऊ देणार नाहीत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसून कामालालागण्यास आम्ही सज्ज आहोत, असा स्पष्ट आणि आक्रमक संदेश देण्यात आला. वरिष्ठांनीही यापुढे कॅडर बेस व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याची चूक होऊ नये, असा गंभीर इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीला पक्ष स्थापनेपासून काम करणारे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत अॅड. राजेश्वर रायेवार, भगवान भंडारी, रविंद्र जैन, भगवान इंगळे, अॅड. रवीकिरण देव, गुलाब सूर्यवंशी, सुनील टाक, दीपक ग्यानचंदाणी, संतोष हिंगमिरे, संतोष पोटे, विजय आडे, गजानन वानखेडे, महादेव भिसे, सुनील वानखेडे, प्रविण फुलारी, गणेश कान्नव यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समावेश होता.