वाशीम,
Makar Sankranti, जिल्ह्यातील महिला बचत गटांनी स्वयंस्फूर्तीने व कौशल्याने तयार केलेले नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी खाद्यपदार्थ सध्या नागरिकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले चिया तिळगुळ लाडू, चिया तीळ वडी व चिया न्यूट्री बार हे पदार्थ पौष्टिकतेसोबतच चवीलाही तितकेच उत्कृष्ट ठरणार आहेत. या उत्पादनांमध्ये चिया बिया, तीळ, गूळ यांसारख्या नैसर्गिक व आरोग्यास पोषक घटकांचा वापर करण्यात आला असून, कोणताही कृत्रिम रंग, स्वाद किंवा संरक्षकांचा वापर टाळण्यात आला आहे. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे पदार्थ लाभदायक ठरणार आहेत. विशेषतः बदलत्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणार्या नागरिकांकडून या उत्पादनांना मोठी पसंती मिळत आहे. दि. १३ व १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वाशीम शहरातील प्रमुख चौकांमध्ये या आरोग्यदायी पदार्थांची विक्री करण्यात येणार आहे. या उपक्रमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवर तयार होणार्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमास भेट देऊन महिलांच्या कष्टाला दाद द्यावी, आरोग्यदायी व स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व खरेदीसाठी ९१८५२३७००४ क्रमांकावर वर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे