नागपूर,
Nagpur University convocation शिक्षण, संशोधन आणि जिज्ञासेला वयाची कोणतीही अट नसून जिद्द महत्वाची असते, हे नागपूर विद्यापीठाच्या ११३ व्या दीक्षांत समारंभाने पुन्हा एकदा अधोरेखित केले. या समारंभात विविध क्षेत्रातील अभ्यासकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी प्रेरणादायी ठरली. कुणी वयाच्या ६५व्या वर्षी पीएचडी प्राप्त केली, तर कुणी वयाच्या ९७ व्या वर्षी डी.लिट. पदवी मिळवून अनेकांना प्रेरणा दिली.
याच दीक्षांत समारंभात नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. विनायक पांडे यांनी वयाच्या ९७ व्या वर्षी अर्थशास्त्रातील डी.लिट. पदवी मिळवून दुर्मिळ विक्रम प्रस्थापित केला. ‘जागतिक आर्थिक मंदी’ या विषयावरील त्यांच्या संशोधनासाठी ही पदवी मंजूर झाली. प्रकृतीच्या कारणास्तव ते समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांच्या वतीने नातेवाईकांनी पदवी स्वीकारली. अध्यापन, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांनी दीर्घ कारकीर्द गाजवली आहे.
डॉ. दीपक वानखेडे यांनी वयाच्या ६५व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भौगोलिक विचारांवर आधारित संशोधनासाठी डी.लिट. पदवी प्राप्त केली आहे. डॉ. वानखेडे यांची ‘जिओग्राफी थॉट्स ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक जगातील २२ विदेशी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करून त्यांनी भूगोल, जलसंपदा विकास आणि राष्ट्रीय नियोजनातील योगदान स्पष्ट केले आहे. दामोदर व्हॅली प्रकल्प, आंतरराज्यीय जलविवाद आणि जलविकासाच्या दूरदर्शी संकल्पनांवर प्रकाश टाकणारे हे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाले आहे. विशेष म्हणजे २००९ मध्ये सादर केलेल्या शोधप्रबंधाची दखल न घेतल्याने माहिती अधिकाराचा वापर करत १६ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना डी.लिट. पदवी प्राप्त झाली.
घनश्याम विठोबा मांगे यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी नागपूर विद्यापीठातून विधी विषयात पीएचडी मिळवून “शिकण्यासाठी वयाची अट नसते” हे सिद्ध केले. या यशाबद्दल त्यांना डॉ. विठ्ठलराव जिभकाटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये निवृत्तीनंतरही शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवत त्यांनी एलएलएम उत्तीर्ण करून पीएचडी पूर्ण केली. भविष्यात कायद्यावर पुस्तक लिहिण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.