मानोरा,
Nepal Taekwondo Championship तालुक्यातील कारखेडा निवासी प्रणव श्रीकृष्ण पाटील यांनी आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे कारखेडा गावाचे नाव थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.

प्रणव पाटील यांनी कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि अपार मेहनतीच्या जोरावर शेजारी राष्ट्र नेपाळ मधील पोखरा या शहरामध्ये आयोजित स्पर्धेत हे यश संपादन केले. स्पर्धेदरम्यान त्यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवत अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यावर मात केली. गत केवळ तिन महिन्यांपूर्वीपासून प्रणव पाटील तायक्वांडो स्पर्धेचा सराव करीत आहे. ताईक्वांडो स्पर्धेमध्ये कमी कालावधीत सुवर्ण यश मिळविणार्या प्रणव पाटील यांना नितीन मेंढे आणि सोनाली ठाकूर यांचेकडून मार्गदर्शन मिळत आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांनी प्रणव पाटील यांचे अभिनंदन केले आहे. प्रणवच्या या यशामुळे गावातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठी प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.