वर्धा,
Pankaj Bhoyar जिल्ह्यात विविध विभागांतर्गत राबविण्यात येणार्या विकास कामांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४१२.७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही मंजुरी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. आतापर्यंत दोन टप्प्यांत ६० टके म्हणजेच २७४.४३ कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. तर ४० टके निधीची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. प्राप्त निधीपैकी विविध विभागांना विकास कामांसाठी ११७.९१ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित ४० टके म्हणजेच १३८.२७ कोटी रुपयांच्या निधीची अजूनही प्रतीक्षा आहे.

सन २०२५-२६ साठी जिल्हा वार्षिक योजनेत सामान्य निधी ३५० कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना करिता ४४ कोटी रुपये, आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनाकरिता १८ कोटी ७० लाख ६ हजार रुपये असा एकूण ४१२ कोटी ७० लाख ६ हजार रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत सामान्य निधीअंतर्गत २१० कोटी रुपये प्राप्त झाले आहे. त्यापैकी ९६.७४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. या निधीतून कृषी व संलग्न कामे, आरोग्य, क्रीडा, शिक्षण, ग्रंथालय, नगरपालिका, महिला व बालकल्याण, जलसंपदा, वीज सेवा, उद्योग, रस्ते विकास, पोलिस विभाग, पर्यटन, इको-टुरिझम, प्रवासस्थळे व नाविन्यपूर्ण उपक्रमांवर खर्च केला जाणार आहे. अनुसूचित जाती व आदिवासी क्षेत्र उपयोजनांसाठी मंजूर ६२ कोटी ७० लाख ६ हजार रुपयांपैकी आतापर्यंत ३७ कोटी ४३ लाख ४४ हजार रुपये जिल्ह्याला मिळाले आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४ कोटी ५६ लाख ८ हजार रुपये, आदिवासी क्षेत्र उपयोजनेसाठी ६ कोटी ६१ लाख ११ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. तीनही हेड अंतर्गत एकूण २७० कोटी ७४ लाख ७८ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
१३८.२७ कोटींची अजून प्रतीक्षा
एकूण मंजूर ४१२.७० कोटींपैकी आतापर्यंत २७४.४३ कोटी रुपये मिळाले आहे. उर्वरित १३८.२७ कोटी रुपयांचा निधी अद्याप प्राप्त व्हायचा आहे. हा निधी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.