भंडारा,
Cement-colored debris निसर्गाच्या अनाकलनीय घटनांनी मानवाला नेहमीच चकित केले आहे, मात्र भंडारा जिल्ह्यातील परसोडी परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. आकाशातून अचानक पडलेल्या दोन रहस्यमय वस्तूंमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. सोबतच कुतूहलही निर्माण झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या वस्तू पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आल्या.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, परसोडी येथील सुगत बौद्ध विहार परिसरात राहणारे किशोर रमेश वाहने (वय ५० वर्षे) यांनी या घटनेची अधिकृत माहिती पोलीस ठाण्यात दिली. घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ७:१५ वाजेच्या सुमारास घडली. परसोडी गावाजवळील एका मोकळ्या ले-आउटच्या जागेत काही लहान मुले थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून हात शेकत बसली होती.
त्याचवेळी, अचानक Cement-colored debris आकाशातून काहीतरी जळत खाली येत असल्याचे मुलांच्या निदर्शनास आले. बघता बघता, अर्ध्या विटेच्या आकाराचे, सिमेंटच्या रंगाचे दोन तुकडे वेगाने जमिनीवर पडले. हे तुकडे पडताना जळत होते, मात्र जमिनीवर आदळल्यानंतर त्यांचा आवाज फारसा झाला नाही. सुदैवाने, हे तुकडे मुलांच्या अंगावर न पडता जवळच पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच परिसरातील कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
वस्तूंचे स्वरूप आणि प्राथमिक निरीक्षण
सदर वस्तू मुलांनी सकाळी किशोर रमेश वाहने यांना दाखवल्या. त्यांनी या वस्तूंची पाहणी केली असता, त्या दिसायला सिमेंटच्या रंगाच्या परंतु वजनाला अत्यंत हलक्या असल्याचे दिसून आले. आकाशातून पडलेली कोणतीही वस्तू सामान्यतः धातूची किंवा दगडाची (उल्का) असते, मात्र या वस्तूंचे 'हलके वजन' हा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय ठरला आहे. किशोर रमेश वाहने यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हे दोन्ही तुकडे पोलीस ठाण्यात जमा केले.पोलिस ठाण्याचे पोलीस हवालीदार शिंगाडे आणि ठाणेदार भिमाजी पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून घटनेची नोंद घेतली आहे. प्राथमिक तपासात या वस्तू मानवनिर्मित उपग्रहाचा ढिगारा (Space Debris) आहेत की नैसर्गिक उल्कापाताचा भाग, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
आपत्ती व्यवस्थापन विभागाची तत्परता
या घटनेची माहिती Cement-colored debris मिळताच जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पडलेल्या वस्तूंचे नमुने सखोल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार कलकत्ता येथील वरिष्ठ चमू तपासणीसाठी येणार आहे.परसोडी आणि संपूर्ण भंडारा जिल्ह्यात या घटनेनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विचार केल्यास, पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या जुन्या उपग्रहांचे अवशेष अनेकदा वातावरणात प्रवेश करताना जळून खाक होतात. त्यातील काही भाग जमिनीपर्यंत पोहोचू शकतात. मात्र, हे तुकडे सिमेंटच्या रंगाचे आणि हलके का आहेत, याचे उत्तर कोलकाता येथील चमूच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान हा उल्कापाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.