गोरखपूर,
gorakhpur-crime-news गोरखपूरच्या गुलरीहा पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने १५ वर्षांच्या मुलीला प्रेमप्रकरणात अडकवले आणि तिला एका धोकादायक कटात सहभागी करून घेतले.
या धक्कादायक घटनेत, एका तरुणाच्या सांगण्यावरून एका अल्पवयीन मुलीने रोज आपल्या आई-वडिलांच्या जेवणात झोपेची औषधे मिसळत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. आई-वडील गाढ झोपेत गेल्यानंतर ती रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडून संबंधित तरुणाला भेटण्यासाठी जात होती. gorakhpur-crime-news मुलीच्या वागण्यात अचानक बदल जाणवू लागल्यानंतर पालकांना संशय आला. ती अनेकदा रात्री घरातून गायब होत असे आणि सकाळी परत येत होती. यामुळे पालकांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुलीकडे एक मोबाईल फोन असल्याचेही त्यांच्या लक्षात आले, ज्यावरून ती उशिरापर्यंत कुणाशी तरी बोलत असल्याचे दिसून आले.
संशय अधिक बळावल्याने एक दिवस पालकांनी मुद्दाम जेवण न करता झोपल्याचे नाटक केले. आई-वडील झोपले आहेत, असे समजून ती मुलगी रात्री घराबाहेर निघाली. त्याच वेळी वडिलांनीही शांतपणे तिचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी मुलीला एका तरुणासोबत रंगेहाथ पकडले. आपण अडकल्याचे लक्षात येताच आरोपी तरुणाने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. gorakhpur-crime-news या प्रकारामुळे कुटुंबीय प्रचंड घाबरले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी वीरू निषाद याने आधी मुलीला मोबाईल फोन देऊन संपर्क वाढवला आणि हळूहळू तिला आपल्या प्रेमजाळ्यात अडकवले. त्यानंतर रात्री भेटण्यासाठी आई-वडिलांना बेशुद्ध करण्याची योजना आखली आणि झोपेची औषधे जेवणात मिसळण्यास मुलीला प्रवृत्त केले. या तक्रारीच्या आधारे गुलरिहा पोलिसांनी वीरू निषाद याच्याविरोधात छेडछाड, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीओ गोरखनाथ रवि सिंह यांनी सांगितले की, प्रकरण अतिशय गंभीर असून आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.