वर्धा,
car-collides-with-a-two-wheeler : सावंगी (मेघे) येथील मेडिकल चौकात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवार ९ रोजी रात्री घडली. या अपघातात मेडिकल कॉलेजचे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अकोला येथील आदित्य साहू (२१) आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मानस सुराणा (२१) यांचा समावेश आहे. दोघेही सावंगी (मेघे) येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य व मानस हे एम. एच. ३० बी. व्ही. ८८४० क्रमांकाच्या दुचाकीने वर्धेच्या दिशेने जात होते. त्याचवेळी जे. एच. १० बी. डब्ल्यू. २०६४ क्रमांकाची भरधाव कार सावंगीच्या दिशेने जात होती. मेडिकल चौकात कारने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघांनाही तात्काळ सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचालक हासुद्धा त्याच मेडिकल कॉलेजमधील अंतिम वर्षाचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. सावंगी पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.