५ हजार भाविकांनी केले विजयग्रंथाचे वाचन

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
recited-the-vijayagrantha : शहरात जागतिक पारायण सोहळा समितीच्या वतीने वैश्विक पारायण दिन मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने रामनगर येथील शहीद भगतसिंग सर्कस मैदानात ५ हजार भाविकांनी एकत्रितपणे गजानन विजयग्रंथाचे पारायण आज रविवार ११ रोजी केले. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असून यंदाचा पारायण सोहळा ऐतिहासिक ठरला.
 
 
jk l
 
 
 
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अ‍ॅड. शीतल पंकज भोयर, सयाजी महाराज, प्रवीण हिवरे, नगरसेवक प्रदीपसिंह ठाकूर, नगरसेविका वंदना भुते, डॉ. अभ्युदय मेघे आदींची उपस्थिती होती. सकाळी ८ वाजता आरतीनंतर गजानन विजयग्रंथाच्या पारायणाला प्रारंभ झाला. सुमारे ५ हजार भाविकांनी एकाच वेळी विजयग्रंथाचे वाचन केले. हे पारायण सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. कार्यक्रमाच्या तयारीसाठी जागतिक पारायण सोहळा समितीचे स्वयंसेवक आठ दिवस पूर्वीपासून परिश्रम घेत होते. पारायणादरम्यान ५०० स्वयंसेवकांनी भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. वृद्ध व अडचण असलेल्या भाविकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सुविधा कार्यक्रमस्थळी होत्या.
 
 
या पारायण सोहळ्यासाठी शेगावीचा योगी गजानन या मराठी चित्रपटातील अभिनेत्री पूनम विनेकर या बायनाबाई यांच्या भूमिकेत उपस्थित होत्या. त्यांनी भाविकांशी संवाद साधत श्री गजानन महाराज यांच्यावरील चित्रपटाबाबत भाविकांना माहिती दिली. सर्कस मैदानासोबतच दादाजी धुनिवाले मठ परिसर आणि कारला चौकातील विठ्ठल-रुमिणी सभागृहात देखील विजयग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीही मोठ्या संख्येने भाविकांनी श्री गजानन विजयग्रंथाचे पारायण केले.
 
 
पुलगावात जागतिक पारायण
 
 
येथील संत गजानन महाराज देवस्थानच्या वतीने ११ रोजी सामूहिक पारायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात श्री गजानन विजयग्रंथाचे पारायण वाचक संध्या गजकेश्वर, अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ८ वाजता पारायणाला प्रारंभ झाला. गजानन महाराज मूर्तीचे पूजन व आरती झाल्यानंतर ग्रंथ पूजन करण्यात आले. पारायणाला मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मुख्य वाचक संध्या गजकेश्वर यांचा देवस्थानच्या सचिव सुनीता मिश्रा यांनी सत्कार केला. संचालन अविनाश भोपे यांनी केले. यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष मनोज देशमुख, प्रमोद घालणी, मनोज चव्हाण, शंकर खंडागळे, शेखर बाभुळकर, संतोष बैतुले, तृप्ती विरखेडे, प्रकाश मेटे, अनिल चव्हाण, रुपाली देशमुख, अल्का घालनी, सुनीता मिश्रा, कमल जगताप, गजानन सरदार, अनिल लेकुरवाळे यांनी परिश्रम घेतले.