ऐन मकरसंक्रातीत तीळ-गुळ महाग

    दिनांक :11-Jan-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
makar-sankranti : अवघ्या दोन दिवसांवर बुधवारी मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. हा सण तीळ-गुळाने साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी मकर संक्रांतीच्या पृष्ठभूमीवर तिळासह गुळाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत असून तीळ विकत घेणे सर्वसामान्यांना परवडणारे राहिले नाही.
 
 

wardha 
 
 
हवामानातील बदल, उत्पादनात झालेली घट, वाहतूक खर्चात वाढ आणि साठेबाजीमुळे हा परिणाम दिसून येत आहे. गुळाच्या किमतीदेखील वाढल्या असून साखर कारखान्यामधील उत्पादन खर्च याला कारणीभूत ठरत आहे. दरवाढ असून देखील तिळगुळाची मागणी आजही कायम आहे. घरगुती पातळीवरच नव्हे तर हॉटेल, मिठाई दुकाने आणि महिला बचत गटाकडून मोठ्या प्रमाणावर तिळाच्या पदार्थाची निर्मिती सुरू आहे. अनेक महिला बचत गटांसाठी तीळसंक्रांत हा सण रोजगार निर्मितीचे साधन ठरत असून तिळाच्या वड्या, चिकी, लाडू यांची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे.
 
 
मकरसंक्रांती हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्याचबरोबर हिवाळ्याच्या ऋतूमध्ये उष्णतेचा स्पर्श वाढू लागतो. या बदलत्या ऋतूचे स्वागत करण्यासाठी तिळगुळ, गुळपोळी, लाडू, तिळाच्या वड्या यासारख्या पदार्थांना विशेष महत्त्व दिले जाते, हे विशेष! ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ हा संदेश देणारा सण सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो. मात्र, ऐन मकर संक्रांतीच्या तोंडावरच तीळ आणि गुळाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.