वॉशिंग्टन,
Anti-Iran rally in America इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये इराणविरोधी रॅलीदरम्यान एका ट्रकने थेट निदर्शकांमध्ये घुसून अनेकांना चिरडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत इराणचे निर्वासित क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांचे अनेक समर्थक जखमी झाले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणमध्ये बेरोजगारी, महागाई आणि उपासमारीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांत आतापर्यंत ५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनांच्या समर्थनार्थ अमेरिकेसह विविध देशांमध्ये निदर्शने होत असताना लॉस एंजेलिसमध्ये ही गंभीर घटना घडली. वृत्तानुसार, लॉस एंजेलिसच्या वेस्टवुड भागातील विल्शायर फेडरल बिल्डिंगच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. इराणमधील आंदोलनांच्या समर्थनार्थ आणि रझा पहलवी यांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू असताना, अचानक एका ट्रकने गर्दीत घुसून लोकांना चिरडले आणि वेगाने पळ काढला. या हल्ल्यात अनेक निदर्शक जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या ट्रकवर इराणच्या इतिहासाशी संबंधित राजकीय संदेश लिहिलेले होते. १९५३ मधील सत्तापालटाचा उल्लेख असलेले संदेश ट्रकवर झळकत होते, तसेच ट्रकच्या बाजूला “नो रेजिम” असे लिहिलेले होते. अमेरिकेने १९५३ सारखी चूक पुन्हा करू नये, असा मजकूरही ट्रकवर दिसून आला. या ट्रकवर इराणी राजेशाहीविरोधी संघटना एमईकेचे स्टिकरही लावलेले होते. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक चालकाला घटनास्थळीच ताब्यात घेतले. संतप्त झालेल्या काही निदर्शकांनी ट्रक चालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा तपास सुरू असून, हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला हल्ला, याचा शोध घेतला जात आहे.
इराणमधील आंदोलनांचे पडसाद केवळ अमेरिकेतच नव्हे, तर युरोपमध्येही उमटत आहेत. रविवारी मध्य पॅरिसमध्ये हजारो लोकांनी इराणमधील निदर्शकांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढला. या मोर्चात अनेकांनी इराणी राजेशाहीचे झेंडे फडकावले, तर काहींनी इस्रायली आणि अमेरिकन झेंडे हातात घेतले होते. हे सर्व लोक निर्वासित क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या पुन्हा सत्तेत परतण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. इराणमधील अंतर्गत अस्थिरता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील निदर्शने आणि अमेरिकेत घडलेला हा अपघात यामुळे मध्यपूर्वेतील राजकीय तणाव अधिक तीव्र होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.