पुणे,
Devendra Fadnavis ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक हिने नुकतीच पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत राजकारणासह कला, नाटक आणि चित्रपटांवर झालेला दिलखुलास संवाद प्रेक्षकांना विशेष भावला.
मुलाखतीदरम्यान गिरीजा ओकने मुख्यमंत्र्यांना, “तुम्ही नाटक किंवा चित्रपट पाहता का? त्यासाठी वेळ मिळतो का? किंवा तुम्हाला आवडलेलं नाटक अथवा चित्रपट कोणता?” असा सवाल केला. यावर फडणवीस यांनी अलीकडच्या काळात फारशी नाटकं पाहायला मिळत नसल्याचं सांगितलं. त्यावर गिरीजाने मिश्कीलपणे, “नाही, नाटकं बघताय तुम्ही, फक्त ती आम्ही केलेली नाहीत,” असं म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर फडणवीस हसत म्हणाले, “नाटकं बघतोय आणि करतोयही… आता काय सांगू?” या संवादामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री Devendra Fadnavis फडणवीस यांनी मराठी रंगभूमीबद्दलचं आपलं जिव्हाळ्याचं नातं उलगडून दाखवलं. “मी पूर्वी फार नाटकं बघायचो. मी फार सीरिअस माणूस नाही, मला हलकं-फुलकंच आवडतं. त्यामुळे ‘सही रे सही’ हे नाटक मला खूप आवडलं होतं. आजही ते नाटक पाहायची इच्छा आहे,” असं ते म्हणाले. लहानपणी पाहिलेल्या ‘तो मी नव्हेच’ या अजरामर नाटकाचा विशेष उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, त्या वयात नाटक पूर्णपणे समजण्याइतपत परिपक्वता नसतानाही त्याचा खोल परिणाम मनावर झाला. “त्या नाटकामुळेच मी मराठी नाटकं नियमित पाहायला लागलो,” असं त्यांनी नमूद केलं.
राजकारणातील अनुभव सांगताना त्यांनी ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा संदर्भ देत एक मार्मिक टिप्पणी केली. “आता राजकारणात इतकी माणसं भेटतात की त्यांना विचारलं, ‘तुम्ही असं का केलंत?’ तर उत्तर मिळतं, ‘तो मी नव्हेच’,” असं म्हणत त्यांनी राजकीय वास्तवावर हलक्याफुलक्या शब्दांत भाष्य केलं.
या मुलाखतीत फडणवीसांनी आणखी एक मजेशीर किस्साही सांगितला. एखादा चित्रपट आपल्याला आवडला नाही, तरी ‘फक्त मीच का ते सहन करू’ या विचाराने ते मित्रांसमोर त्या चित्रपटाचं मुद्दाम कौतुक करायचे. इतकंच नव्हे तर मित्रांसाठी स्वतः तिकिटं खरेदी करून त्यांना चित्रपट पाहायला पाठवायचे. नंतर मित्र चित्रपट पाहून आल्यावर, दोघं मिळून इतरांसमोर त्या चित्रपटाचं कौतुक करायचे, असा हा किस्सा ऐकून उपस्थितांनाही हसू अनावर झालं.गिरीजा ओक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा संवाद केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आणि मानवी पैलूंना स्पर्श करणारा ठरला. मराठी नाटकांवरील प्रेम, विनोदबुद्धी आणि अनुभवकथनामुळे ही मुलाखत प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.