गडचिरोली,
Dharmarao Baba Atram गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. ते नवनिर्वाचित नगरसेवक लीलाधर भरडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना आत्राम म्हणाले की, एक आमदार म्हणून तसेच या जिल्ह्याचा रहिवासी म्हणून नगरपरिषदेच्या तिन्ही घटकांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे. सध्या आपण युतीत आहोत आणि सर्वांनी मिळून एकदिलाने काम केले, तर गडचिरोलीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे. शहरातील रस्ते, नाल्या तसेच मूलभूत सुविधांची कामे प्राधान्याने झाली पाहिजेत. विकासासाठी सर्वांनी एकत्र लढण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीचा विकास हेच आपले ध्येय असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रवींद्र ओलालवार, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, प्रा. राजेश कात्रटवार, जेसा मोटवानी, नाना नाकाडे, डॉ. प्रमोद साळवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. सोनल कोवे, कविता मोहरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रास्ताविकात नगरसेवक लीलाधर भरडकर म्हणाले की, जनतेने मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले असून माझ्या प्रभागातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने खुले राहील. लोकांची कामे करणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लीलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रिंकू पापडकर यांनी केले.