गडचिरोली,
Gondwana University, युगनायक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राच्या वतीने आज एक प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद Gondwana University, यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. प्रमुख वक्ते म्हणून सिनेट सदस्य प्रा. धर्मेंद्र मुनघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राचे प्रस्तावक तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतूलवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे तसेच कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अपर्णा भाके उपस्थित होत्या.
यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे आजच्या समाजात आणि विशेषतः युवकांमध्ये असलेले महत्त्व अधोरेखित केले. स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे असून, ते युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शक आहेत, असे त्यांनी नमूद केले.
मुख्य वक्ते प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी स्वामीजींचे बालपण, संन्यास स्वीकारण्याचा प्रवास, शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत दिलेले ऐतिहासिक भाषण, तसेच युवकांसाठी दिलेले आत्मबल, परिश्रम आणि चरित्र्य निर्माणाचे संदेश प्रभावीपणे मांडले. युवकांनी आत्मविश्वास बाळगून ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे. तसेच आपले आयुष्य हे राष्ट्रासाठी असावे, असे प्रतिपादन केले. सदर व्याख्यान कार्यक्रमातून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा युवकांवर सकारात्मक प्रभाव पडून त्यांना आत्मविकास, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.
वक्त्यांचा परिचय सहाय्यक प्रा. अनंता गावंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तावक तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतूलवार यांनी केले. संचालन धैर्यशील खामकर यांनी तर आभार समन्वयक डॉ. अपर्णा भाके यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.