नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. फिरोज शेकुवाले यांची निवड

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
कारंजा लाड,
Deputy Mayor Firoz Shekuwale कारंजा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. फिरोज शेकुवाले यांची निवड झाली. नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा सोमवार, १२ जानेवारी रोजी नगर परिषद कार्यालयात पार पडली. उपाध्यक्ष पदासाठी एमआयएमचे अ‍ॅड.फिरोज शेकुवाले आणि भाजपाचे अजय श्रीवास या दोघांनी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत नगराध्यक्षांच्या मतासह एमआयएमचे फिरोज शेकुवाले यांना १७ मते मिळाली तर भाजपाचे अजय श्रीवास यांना १३ मते मिळाली.
 

Deputy Mayor Firoz Shekuwale  
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमोद गायकवाड आणि घाटंजी विकास पॅनेलचे अमोल गढवाले तटस्थ राहिले. त्यामुळे पिठाशीन अधिकार्‍यांनी कारंजा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड.फिरोज शेकूवाले यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नगराध्यक्ष फरीदाबानू मोहम्मद शफी पुंजाणी यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. तर मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी त्यांना सहकार्य केले. भाजपाच्या वतीने अतुल चीमेगावे आणि एमआयएम च्या वतीने शोयबभाई आणि एजाजभाई यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना अ‍ॅड. शेकुवाले यांनी नगरपरिषदेच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच नागरी समस्या सोडविण्यावर भर देण्यात येईल, असेही सांगितले.या निवडीमुळे कारंजा नगर परिषदेच्या प्रशासनात नवे युवा नेतृत्व पुढे आले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.