वेध.....
loco-pilot-st-driver : ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे,’ असे म्हणत आपणच सर्वांना समान लेखण्याचा विचार मांडतो. पण प्रत्यक्षात व्यवस्थाच समान काम करणाèयांमध्ये तुलना करीत, त्यांना वेगवेगळे मापदंड लावत असते. याच कारणाने आज भारतीय रेल्वेत कार्यरत लोको पायलट तुपाशी, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक उपाशी आहेत. हा प्रकार किती दिवस सहन केला जावा, यावर आता उपाययोजना करायची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रात एसटी महामंडळात 1 लाख 2 हजार पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. यात 15 हजारांपेक्षा जास्त चालक कार्यरत आहेत. एसटी गाड्यांची संख्या 18 हजार 449 आहे. दररोज एसटीतून सरासरी 70 लाख प्रवासी प्रवास करून आपल्या घरी सुरक्षितपणे जातात. ही सेवा त्यांना राज्यातील 247 आगार आणि 578 बसस्थानकांमार्फत मिळत आहे. सर्व एसटीचा डोलारा हा पूर्णत: चालकांच्या कौशल्यावरच चालतो.
एसटी चालकाच्या पगाराची सुरुवात ही 17 ते 20 हजार रुपयांनी होते. त्यांना राज्यात सर्वत्र बसगाडी न्यावी लागते. रात्रीला मुक्कामही करावा लागतो. पूर्वी रात्रीला चालक आणि वाहकाने मुक्काम केल्यास केवळ 7 रुपये मिळायचे. पण आता ती रक्कम 70 रुपये झाली आहे. चालक आणि वाहकांना गणवेश धुण्यासाठी महिन्याला 100 रुपये मिळतात. रात्री ग्रामीण भागात मुक्काम करायचा असेल तर दोघांनाही गाडीतच झोपावे लागते. तिथे डासांचे प्राबल्य शिवाय प्रसाधन गृह नसल्याने त्यांना अनंत यातना होतात. परिणामी त्यांची झोप अपुरी होते. त्याचाही परिणाम सेवेवर होतो. याचा विचारच केला जात नाही. त्याचवेळी रेल्वेतील लोको पायलटला मात्र क्लास वननुसार सोईसुविधा मिळतात. लोको पायलटवर हजारो प्रवाशांची जबाबदारी असते. अगदी अशीच जबाबदारी एसटीत कार्यरत चालकांवरही असते. केवळ प्रवाशांची संख्या कमी असते. पण रेल्वेतील प्रवासी आणि एसटीतून प्रवास करणाèया नागरिकांचा जीव सारखाच आहे ना? मग दोघांची जबाबदारी सारखीच असल्याने सोईसुविधांमध्ये भेदभाव का करायला हवा, हाच आजचा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोको पायलटला सुविधा मिळते त्याला कुठल्याही सुज्ञ व्यक्तीचा विरोध नाही.
कारण तेही फार मोठे कार्य करीत आहेत. पण त्यांचा जेव्हा तुम्ही चांगला विचार करता तेव्हा एसटी महामंडळातील चालकांचा आणि वाहकांचा विचारही माणसासम करायला हवा ना? ग्रामीण भागात बहुतांश गावात समाजभवनाची निर्मिती झालेली आहे. तिथे ग्रामपंचायतींनी चालक आणि वाहकांसाठी सोईसुविधा द्यायला हव्यात. नव्हे तसाच करार एसटी महामंडळाशी झालेला आहे. पण त्याचे कुणीही पालन करीत नाही. उलट एसटी चालक आणि वाहकाशी आपल्याला काय देणे-घेणे असे म्हणत ग्रामपंचायतसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. म्हणजे तिकडे महामंडळ सोईसुविधा देत नाही, तर ज्यांनी करार केला तेही त्याचे पालन करीत नाही. या स्थितीत चालक आणि वाहकांचा विनाकारण बळी जातो. त्याचवेळी आपला लोको पायलट सुरक्षित आणि तणावमुक्त राहावा यावर भारतीय रेल्वे विशेष भर देते. त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करून तुमचा पती अर्थात लोको पायलट देशासाठी किती महत्त्वाचा हे पटवून देते. येथे उलटेच आहे. एसटी महामंडळात चालकाने अपघात केल्यावर त्याचे समुपदेशन केले जाते. त्याला चूक पुन्हा करू नको म्हणून प्रशिक्षण दिले जाते.
मग तीच गोष्ट एसटी महामंडळात अपघातापूर्वी का नाही केली जात, यावरही संशोधन करावे लागेल. एसटी महामंडळानेही चालक आणि वाहकांच्या कुटुंबीयांना एकत्र आणून त्यांचे समुपदेशन करायला हवे. त्यांनाही ‘तणाव ठेवा घरी, गाडी चालवा बरी’ याचे सूत्र समजावून सांगायला हवे. एसटी चालकही दररोज 300 किलोमीटर वाहन चालवितो. त्यालाही बसमधील सरासरी 70 प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी सोडायचे असते. त्यांचेही कार्य सोपे नाही. रेल्वेची स्वत:ची यंत्रणा फूलप्रूफ आहे. रेल्वे रूळांवर चालते तर एसटी चालकाला रस्त्यावरील यमांच्या मधून सुरक्षितपणे मार्ग काढून प्रवास करावा लागतो. तसे पाहता एसटी चालकांचे कार्य महाकठीण आहे. असे महाकठीण कार्य दररोज न चुकता व्यवस्थित जे चालक करतात, त्यांचा व्यापक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. त्यांनाही चांगला पगार, सोईसुविधा द्यायला हव्यात. चालकांनाही आपल्या कार्यावर अभिमान वाटावा अशी एसटीची नोकरी भविष्यात व्हावी. जेव्हा असे होईल त्या दिवशी खरोखरच आपल्या महाराष्ट्रातील लालपरीने प्रवास करणारेही सुखावतील अन् चालक मनोमन महामंडळाचे आभार मानतील.
अनिल उमाकांत फेकरीकर
9881717859