इंडियन आयडल विजेते प्रशांत तमांगचे झोपेतच निधन

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Prashant Tamang passed away इंडियन आयडल सीझन ३ जिंकून देशभरात लोकप्रिय ठरलेले गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे रविवारी, ११ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रशांत तमांग यांचे निधन झोपेतच झाले असून हा नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती त्यांच्या पत्नी मार्था एले यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
 

prashant tamang
 
 
पतीच्या आकस्मिक निधनामुळे अतिशय दुःखी झालेल्या मार्था यांनी एएनआयशी बोलताना जगभरातून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या म्हणाल्या की, त्यांना जगभरातून फोन येत असून ओळखीचे आणि अनोळखी लोक फुले पाठवत आहेत. अनेक जण त्यांच्या घराबाहेर जमा झाले आहेत, तर काहीजण प्रशांत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावनिक असल्याचे सांगत त्यांनी चाहत्यांना प्रशांतवर नेहमीप्रमाणेच प्रेम करत राहण्याचे आवाहन केले. ते एक महान आत्मा आणि अतिशय चांगला माणूस होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
प्रशांत यांच्या मृत्यूबाबत पसरत असलेल्या अटकळी आणि अफवांवरही मार्था यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की हा कोणत्याही प्रकारे संशयास्पद मृत्यू नाही, तर पूर्णपणे नैसर्गिक मृत्यू आहे. ते झोपेत असतानाच आम्हाला सोडून गेले आणि त्या वेळी आपण त्यांच्या शेजारीच होतो, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांनीही माहिती दिली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीचे एडीसीपी अभिमन्यू पोसवाल यांनी एएनआयला सांगितले की, दुपारी ३.१० वाजता माता चानन देवी रुग्णालयातून एमएलसी प्राप्त झाला. रघु नगर येथील रहिवासी प्रशांत तमांग यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, तपास अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे.
 
दार्जिलिंगचे रहिवासी असलेल्या प्रशांत तमांग यांनी २००७ मध्ये इंडियन आयडल जिंकण्यापूर्वी पश्चिम बंगाल पोलिस ऑर्केस्ट्रामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. इंडियन आयडलमधील विजयानंतर ते घराघरात पोहोचले. पुढे त्यांनी अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवत नेपाळी चित्रपटांमधून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. गोरखा पलटन, निशाणी यांसारख्या चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याशिवाय पाताल लोक सीझन २ सह अनेक हिंदी प्रकल्पांमध्येही त्यांनी काम केले. वृत्तानुसार, ते सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातही झळकणार होते. त्यांच्या अकाली निधनाने संगीत आणि चित्रपटसृष्टीतून एक लोकप्रिय आणि संवेदनशील कलाकार हरपला आहे.