अलिबाग,
Raigad Fort light and sound show किल्ले रायगडाचा गौरवशाली इतिहास आता अत्याधुनिक लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून पर्यटकांसमोर उलगडणार असून, देशातील पहिला ३६० अंशांचा लाईट अँड साऊंड शो लवकरच किल्ले रायगडावर सुरू होणार आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. त्यांनी नुकतीच या प्रकल्पाच्या प्राथमिक तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.
या अभिनव शोमध्ये Raigad Fort light and sound show किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तू आणि शिवकालीन वैभव अत्याधुनिक प्रकाशयोजना व ध्वनिप्रभावांच्या माध्यमातून सुमारे ४५ मिनिटांत सादर केले जाणार आहे. गडावर ३६० अंशांमध्ये बसवण्यात येणाऱ्या स्पॉट लाईट्स आणि साऊंड सिस्टिमद्वारे बाजारपेठ, होळीचा माळ, नगारखाना, राजसदर, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ तसेच इतर महत्त्वाच्या शिवकालीन वास्तू जिवंत स्वरूपात उभ्या राहणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना केवळ पाहण्यापुरतेच नव्हे, तर रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे.हा लाईट अँड साऊंड शो मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये सादर केला जाणार आहे. आठवड्यातून चार दिवस मराठी, एक दिवस हिंदी आणि एक दिवस इंग्रजी भाषेत शो करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सूर्यास्तानंतर ठरावीक वेळेत या शोचे आयोजन करण्यात येईल, जेणेकरून शो संपल्यानंतर पर्यटकांना रोपवेच्या माध्यमातून सुरक्षितपणे गडाखाली उतरता येईल. एका वेळी सुमारे ४०० ते ५०० पर्यटकांना हा अनुभव घेता येणार आहे.
६०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी
दरम्यान, राज्य सरकारने Raigad Fort light and sound show किल्ले रायगडाच्या जतन आणि संवर्धनासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार गडावर तसेच पाचाड परिसरात विविध विकास व संवर्धन कामे सुरू करण्यात आली आहेत. किल्ल्यावर होणारी कामे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून केली जात असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महाड ते पाचाड रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. याचबरोबर पाचाड येथे भव्य शिवसृष्टी उभारण्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या सर्व कामांवर देखरेख ठेवण्यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.अलीकडेच सोशल मीडियावरून रायगडावरील जतन आणि संवर्धन कामांवर टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील एका रिलच्या माध्यमातून लौकिक गोळे या तरुणाने गडावरील पायऱ्या आणि भिंतींच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांधकामातील दगड सहज निखळत असल्याचे तसेच दगडांच्या सांध्यांमध्ये माती भरल्याचे दृश्य दाखवत त्यांनी या कामांवर आक्षेप नोंदवला आहे.या टीकेला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर रिल तयार करून टीका करण्याऐवजी संबंधितांनी थेट रायगड प्राधिकरणाकडे तक्रार करावी. प्राधिकरणामार्फत सुरू असलेली जतन आणि संवर्धनाची सर्व कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियमानुसारच केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. किल्ले रायगडाचा ऐतिहासिक वारसा जपताना कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.