तेलंग राय पतसंस्था सभागृहात सहकार भारती स्थापना दिन
आर्वी : कुठल्याही क्षेत्रात कार्य करीत असताना सहकाराची गरज भासते. योग्य न्याय, उद्दिष्टपूर्तीकरिता आणि सामूहिक विकास घडवून आणण्यासाठी सहकाराची नितांत आवश्यकता आहे. सहकाराच्या माध्यमातून समाज एकत्रित करून समाजाला आर्थिक शिस्त व दिशा देण्याचे काम सहकार भारती करीत आहे. Sahakar Bharati सहकार भारतीच्या तत्त्वावर आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य सुरू असून ते योग्य दिशेने आणि प्रामाणिकपणे पार पडत असल्याचे प्रतिपादन मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जोशी यांनी केले.
आर्वी येथील तेलंगराय सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सहकार भारती, आर्वी तालुयाच्या वतीने सहकार भारती स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे, तेलंग राय पतसंस्थेचे अध्यक्ष विनायक पोतदार, Sahakar Bharati सहकार भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काकडे, तेलंग राय पतसंस्थेचे सचिव सुनील पारसे यांची उपस्थिती होती.
यावेळी सहकार भारतीच्या स्थापनेपासूनच्या कार्याविषयी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. सहकार क्षेत्रात कार्य करीत असताना अनेक अडचणींवर मात करून त्यातून मार्ग काढीत सहकारी भारतीचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. सध्या स्थितीत सहकार भारती प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून, बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उद्धार, या ब्रिदवायाप्रमाणे प्रत्येकांनी सहकार भारतीशी जुळावे, असे आवाहन सुनील पारसे यांनी केले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सुनील पारसे यांनी ग्रंथ भेट देऊन तर सार्वजनिक ग्रामीण वाचनालयाचे प्रवीण सरोदे यांच्या हस्ते राष्ट्रसंतांची ग्रामगीता देऊन नगराध्यक्ष गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता तेलंग राय पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला तालुका संघचालक रमेश नागोसे, राजाभाऊ गिरधर, राम मोहदेकर, अरुण भालेराव, संदीप पोकळे, नरेंद्र काकडे, सतीश देशपांडे, ज्योत्स्ना गिरधर, थोरात, मसराम, ज्ञानेश्वर पोजगे, अशोक जिरापुरे, सुरेंद्र पारसे, सुहास ठाकरे, कविता जोशी, यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते. संचालन Sahakar Bharati सहकार भारतीचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत महाजन यांनी तर आभार श्याम काळे यांनी मानले.