आज इस्रोमार्फत अवकाशात झेपावणार ‘संस्कारसॅट-१’

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
अहमदाबाद,
SanskarSat-1 will soar into space भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो नव्या वर्षातील पहिले प्रक्षेपण सोमवार, १२ जानेवारी रोजी करणार असून, या मोहिमेत अहमदाबादमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘संस्कारसॅट-१’ हा उपग्रहही अवकाशात झेपावणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील संस्कारधाम संस्थेतील अवघ्या १५ विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या उपग्रहामुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे. संस्कारसॅट-१ हा एक अनोखा उपक्रम असून, इयत्ता सातवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपग्रह निर्मितीची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरते न थांबता, विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण उपग्रह मोहिमेवर प्रत्यक्ष काम केले. अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी वर्गात शिकलेले ज्ञान वास्तव जीवनातील वापरात आणले, हे या प्रकल्पाचे मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे.
 
 
 
SanskarSat-1 will soar into space
संस्कारसॅट-१ हा एक लहान क्यूबसॅट असून, तो मुख्यतः शैक्षणिक आणि प्रयोगात्मक उद्देशाने डिझाइन करण्यात आला आहे. क्यूबसॅट हे घनाकार स्वरूपातील छोटे उपग्रह असतात, जे मोठ्या उपग्रहांसोबत पिगीबॅक पेलोड म्हणून प्रक्षेपित केले जातात. या उपग्रहाच्या माध्यमातून उपग्रह पृथ्वीशी कसा संवाद साधतो, माहिती कशी पाठवली व प्राप्त केली जाते आणि त्या डेटचे विश्लेषण कसे केले जाते, याचा प्रत्यक्ष अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
 
या प्रकल्पाच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्रही उभारले होते. या केंद्राच्या मदतीने रिअल-टाइम डेटा गोळा करण्यात आला असून, त्याचा वापर शेती, हवामान निरीक्षण आणि पर्यावरणीय अभ्यासासाठी कसा करता येतो, याची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. उपग्रह अनुप्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा टप्पा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. संस्कारसॅट-१ प्रकल्पात एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी पाच वेगवेगळ्या संघांमध्ये विभागून काम केले. उपग्रहाचे डिझाइन, निर्मिती, मिशन नियोजन, असेंब्ली, इंटिग्रेशन आणि चाचणी तसेच गुणवत्ता हमी यांसारख्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांनी जबाबदारीने काम केले. इस्रोच्या आगामी प्रक्षेपणासह हा उपग्रह अवकाशात झेपावणार असून, विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला देशभरातून कौतुकाची दाद मिळत आहे.