स्वामी विवेकानंदांची भारतभक्ती

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
swami vivekanandas 16 जानेवारी 1897 रोजी कोलंबो येथील फ्लोरल हॉल या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी आपले पहिले विदेशातील जाहीर व्याख्यान दिले होते. आपल्या या भाषणात ते म्हणतात की, पूर्वी कदाचित भावनेच्या भरामध्ये ज्यावर मी विश्वास ठेवीत असे, ते आता माझ्यासाठी ठाम प्रमाण सिद्ध सत्य होऊन बसले आहे. पूर्वी सगळ्या हिंदूंप्रमाणे मलाही वाटत असे की भारत पुण्यभूमी आहे, भारत ही कर्मभूमी आहे. परंतु आज आपल्या समोर उभा राहून मी अगदी ठासून सांगू शकतो की हे सत्य आहे, नितांत सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. या पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता देश असेल की ज्याला पुण्यभूमी हे गोड नाव यथार्थपणे देता येईल; जर असे कोणते एखादे स्थान असेल की जिथे जगामधील सर्व जीवांना आपल्या कर्मफलाचा उपयोग घेण्यासाठी यावे लागेल; जर असे एखादे ठिकाण असेल की भगवत लाभाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला अंती जिथे येऊन दाखल व्हावेच लागेल; जर असे एखाद्या स्थान असेल जिथे माणसात कोमलता, शुचिता, दया, दाक्षिण्य, क्षमा इत्यादी सद्गुणांचा इतर कुठल्याहीपेक्षा अधिक विकास झाला आहे; जर अशी कोणती एखादी भूमी असेल जिला अंतर्दृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय.
 
 

स्वामी विवेकानंद  
 
 
भारत आणि भारतीयांबद्दल स्वामीजींच्या मनामध्ये अत्यंत प्रेम होते. परंतु इतर देश, त्यांची संस्कृती, त्यांची सभ्यता पाहिल्यानंतर त्यांना असे लक्षात आले की, चार-दोन यंत्र बनविणाèया या लोकांचा आपण इतका उदो-उदो करत आहोत, परंतु त्यांचा माणूस म्हणून अद्याप फारसा विकास झालेला नाही. ते म्हणतात की, कोट्यवधी स्त्री-पुरुषांच्या जीवनाचा दाह करणारा, त्यांची हृदये करपून टाकणारा जडवादाचा अग्नी विझविण्याचे सामर्थ्य असलेला अमृतोपम शांतिजलाचा अक्षय ठेवा एक मात्र या आपल्या भारत भूमीतच विद्यमान आहे. जगामधील विविध धर्म, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे अनुयायी पाहिल्यानंतर स्वामीजी म्हणतात की, परधर्म सहिष्णुता ही गोष्ट जगाने भारतापासूनच शिकायला हवी. ते म्हणतात की, हीच केवळ भूमी आहे ज्या भूमीमध्ये आम्ही मुसलमानांना मशीद बांधून दिलेली आहे, ख्रिश्चनांसाठी आम्ही चर्च बांधलेले आहे. त्यामुळे परधर्म सहिष्णुता जर कोणाला जगात कुठेही बघायची असेल तर ती केवळ या भारत भूमीतच बघता येईल. ते म्हणतात की, एखाद्या मुस्लिम राष्ट्रामध्ये एखाद्या ख्रिश्चनाला चर्च बांधून मिळणार नाही आणि ख्रिश्चन राष्ट्रांमध्ये सुद्धा तेथील लोक एखाद्या मुस्लिम धर्मीयाला मशीद बांधून देणार नाही. परंतु आमच्या देशातील सभ्यता अशा पद्धतीची आहे की तिने परमेश्वराला कुठल्याही नावाने हाक मारणाèया प्रत्येकाला त्याच्या त्याच्या उपासना पद्धतीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. एवढेच नव्हे तर त्यांची प्रार्थनागृहे सुद्धा आम्ही बांधून दिलेली आहे. स्वामीजी म्हणतात की, संपूर्ण विश्वामध्ये धर्माच्या नावावर केवळ तिरस्कार आणि विद्वेष सुरू आहे. त्या सर्वच लोकांनी भारताच्या आश्रयाला आले पाहिजे आणि येथून शिक्षण ग्रहण केले पाहिजे. स्वामीजी म्हणतात, आपला भारतच जगाला अध्यात्माचे पसायदान देणार आहे.
स्वामीजी म्हणतात की, प्राचीन आणि वर्तमानकाळी काही जातींच्या जीवनाच्या लोंढ्याबरोबर महान शक्तिशाली सत्यांची बीजे इकडे-तिकडे विखुरली गेली आहेत. पण माझ्या मित्रांनो, लक्षात ठेवा त्या साऱ्याचा प्रचार झाला आहे रणशिंगाच्या कर्कश निनादाने, रणसाज चढविलेल्या बेगुमान सैनिकांच्या धुमाळीमध्ये, मानवी रक्तात भिजविल्याशिवाय लाखो बांधवांचे रक्त सांडविल्याशिवाय यातील कोणतीही जात दुसèया जातीला आपला विचार व सिद्धांत देऊ शकलेली नाही. यातील प्रत्येक ओजस्वी सिद्धांताच्या प्रचाराबरोबरच उठले आहेत लाखोगणती निरपराध लोकांचे हाहाकार, उसळले आहेत अनाथ बालकांचे चित्कार, वाहिले आहेत दीन विधवांचे अश्रू. परंतु भारत या उपायांची कास न धरताही हजारो वर्षे जिवंत आहे.
 
स्वामीजी म्हणतात, आमचे राष्ट्र अति प्राचीन राष्ट्र आहे. जेव्हा ग्रीस अस्तित्वात देखील नव्हता, रोम अजून जन्माला यायचा होता, ज्यावेळी आधुनिक युरोपियन यांचे पूर्वज जर्मनीच्या घनदाट जंगलात असभ्य दशेत खितपत, निळ्या रंगाने आपली अगे रंगवीत असत, तेव्हाही त्याकाळीही भारत क्रियाशील होता. इतिहासाला ज्या काळाची माहिती नाही, दंतकथा ही ज्या काळाच्या घनांधकाराचा भेद करू शकत नाही त्या अति प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत कल्पनामागून कल्पना आणि सिद्धांतांमागून सिद्धांत, विचारांमधून विचार या भारतातून बाहेर गेले आहेत. परंतु त्या सर्वांच्या, त्यातील प्रत्येकाच्या पुढे शांती आणि मागे आशीर्वाद होता.
 
स्वामी विवेकानंद हे योद्धा संन्यासी होते. त्यांना जीवनाच्या सर्वच स्तरांमध्ये संघर्ष करावा लागला. ते जगविख्यात झाले, परंतु त्यांचा प्रवास हा सोपा नव्हता. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे जेव्हा त्यांना नोकरीची आवश्यकता होती तर त्याही वेळेस कोणी त्यांना मदत केली नाही. स्वतःच्या भरवशावर ते ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागले होते. परंतु तेथील राजकारणाने त्यांना शाळा सोडण्यास बाध्य केले. जेव्हा ते अध्यात्माकडे आकर्षित झाले त्यावेळेस बुद्धीमधील नाना तर्क आणि कुतर्क, समाजबांधवांनी त्यांची केलेली उपेक्षा, कौटुंबिक अडचणी या सर्व पृष्ठभूमीवर संन्यासी होणे हे सुद्धा त्यांच्यासाठी सोपे नव्हते. सर्वधर्म परिषदेसाठी शिकागोला जाण्यासाठी सुद्धा जे मदत करतील असे वाटत होते त्यांनी सुद्धा मदत केली नाही. कसेबसे अमेरिकेला पोहोचल्यावर तेथे सुद्धा त्यांना राहणे, खाणे आणि इतर व्यवस्था करण्यासाठी संघर्ष करावा लागला. असे सर्व असले तरी त्यांच्यासमोर भारत माता, भारतीय हे सदैव सर्वोच्च स्थानावर राहिले. अमेरिकेतील वैभव बघून त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. भारतातील दरिद्री जनता, येथील दारिद्र्य या सर्व गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. एकीकडे भोग विलासात रमलेले पाश्चात्त्य लोक आणि दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणारा भारतीय समाज हे दृश्य त्यांच्यासमोर उभे राहिले.
स्वामीजी म्हणतात, येणारी 50 वर्षे तरी भारत माता ही आपल्यासाठी सर्वोच्च आराध्य देवता असायला पाहिजे. भारत आणि भारतीय समाज हा आमच्या जीवनातील सर्वोच्च प्राथमिकता असायला पाहिजे. हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेले आहे. आजही धर्मांध आणि कट्टरवादी शक्ती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात थैमान घालीत आहेत. त्यांच्यामुळे शांत आणि सहिष्णू लोकांचे जीवन धोक्यामध्ये येत असते. बांगलादेशमध्ये घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना या आपल्याला हेच सांगत आहेत. स्वामीजींनी या असहिष्णू लोकांना ओळखले होते.swami vivekanandas विश्वाच्या शांतीसाठी हे लोक धोका आहेत हे सुद्धा त्यांनी ओळखले होते. स्वामीजींनी आपल्या देशबांधवांना तुम्ही द्वेष आणि मत्सराचा त्याग करा हा संदेश दिलेला आहे. स्वामीजींच्या जयंतीनिमित्त देशामध्ये आणि विदेशामध्ये काम करणारऱ्या सर्व भारतप्रेमी शक्तींनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंदांचे शक्तिशाली भारताचे स्वप्न, जगद्गुरू भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत मातेच्या सुपुत्रांनी प्राथमिकतेने, परिश्रमपूर्वक तन-मन-धन समर्पित करून कार्य करणे हे स्वामी विवेकानंदांचे कृतज्ञ स्मरण ठरेल.
अमोल पुसदकर