सेक्सच्या उद्देशाने घरात शिरला, नकारानंतर तरुणीला जाळले!

    दिनांक :12-Jan-2026
Total Views |
बेंगळुरू,
The girl who refused was burned बेंगळुरूमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या जाळून झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. या घटनेत १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून, लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातूनच हा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जाळून आगीचा अपघात असल्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे. ही घटना ३ जानेवारी रोजी बेंगळुरू पूर्वेकडील सुब्रमण्यपुरा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये घडली. त्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली, मात्र त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर डी. के. शर्मिला यांचा जळून मृत्यू झाला.
 
 
burned
 
सुरुवातीला ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झालेला अपघात असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पीडितेच्या एका जवळच्या मित्राच्या तक्रारीवरून राममूर्ती नगर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, तपास पुढे जाताच या प्रकरणामागील भयावह सत्य उघड झाले. फॉरेन्सिक तपासात कोणत्याही प्रकारच्या विद्युत बिघाडाचे पुरावे आढळले नाहीत, तर शवविच्छेदन अहवालात शर्मिला यांचा मृत्यू भाजल्यामुळे नव्हे, तर गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक पुरावे आणि परिसरातील माहितीच्या आधारे पोलिसांनी पीयूसीमध्ये शिकणारा आणि शर्मिलाचा शेजारी असलेला १८ वर्षीय कर्णल कुरई याला ताब्यात घेतले. कठोर चौकशीनंतर कुरईने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजता कुरई स्लाइडिंग विंडोमधून शर्मिलाच्या फ्लॅटमध्ये शिरला. त्याने तिच्याकडे लैंगिक संबंधांची मागणी केली. शर्मिलाने विरोध करताच आरोपीने तिचे तोंड आणि नाक दाबले व गळा आवळून तिला बेशुद्ध पडेपर्यंत दाबून धरले, ज्यात तिचा मृत्यू झाला.
 
गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने बेडरूममधील कपडे आणि काही साहित्य एकत्र करून आग लावली, जेणेकरून ही घटना अपघात असल्याचे भासावे. त्यानंतर तो शर्मिलाचा मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. विराजपेटचा रहिवासी असलेला कुरई बेंगळुरूमध्ये आपल्या आईसोबत राहत होता. पोलिसांनी शनिवारी आरोपी कर्णल कुरई याला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे बेंगळुरूमध्ये सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.