नवी दिल्ली,
UPSC authentication applicable यूपीएससी परीक्षेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्रावर फेशियल ऑथेंटिकेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) यासंदर्भात अधिकृत सूचना जारी केली आहे, आयोगाच्या सूचनेनुसार, “यूपीएससी परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्रावर फेशियल ऑथेंटिकेशन करावे लागेल.” यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि फसवणूक किंवा अन्य गैरव्यवहार टाळता येतील. नवीन तंत्रज्ञानाद्वारे उमेदवारांची पडताळणी फक्त ८ ते १० सेकंदात पूर्ण होईल, ज्यामुळे प्रवेश प्रक्रिया जलद होईल आणि परीक्षा प्रणाली अधिक मजबूत बनेल. ही प्रणाली सर्व यूपीएससी परीक्षांमध्ये लागू केली जाईल.

यूपीएससी विविध सरकारी भरती परीक्षांचा आयोजन करते, ज्यामध्ये नागरी सेवा परीक्षा, सीडीएस, एनडीए, इतर परीक्षा समाविष्ट आहेत. या परीक्षांद्वारे आयएएस, आयएफएस, आयपीएस यांसारख्या उच्च पदांसाठी अधिकारी निवडले जातात. यापूर्वी यूपीएससीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट राबवला होता. हा प्रोजेक्ट १४ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुग्राममधील निवडक परीक्षा केंद्रांवर एनडीए व सीडीएस परीक्षा २०२५ साठी लागू करण्यात आला. या प्रक्रियेत परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे फोटो त्यांच्या नोंदणी फॉर्ममध्ये दिलेल्या छायाचित्रांशी डिजिटली जुळवले जातात. या नव्या बदलामुळे यूपीएससी परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.