प्रामाणिकपणा आणि विवेकानेच होते समाजोन्नती- पद्मश्री डॉ. विलास डांगरे

भावसार समाजाचा शताब्दी सोहळा थाटात

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |

Bhavsar community
 
नागपूर,
Bhavsar community's centenary celebration सध्याच्या समाजजीवनात लबाडपणा, दिखाऊपणा आणि भोंदूपणाची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. अशा काळात प्रामाणिकपणे विचार करून आणि विवेक जागृत ठेवून समाजहितासाठी काम करणे हीच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांनी केले. नागपूर भावसार क्षत्रिय समाज पंचकमेटीच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. हा सोहळा भावसार सेलिब्रेशन सभागृह, हुडकेश्वर (पिपळा रोड) येथे पार पडला.
 
 
 
Bhavsar community
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. डांगरे यांनी समाजसेवेच्या संकल्पना केवळ औपचारिक न ठेवता त्या कृतीत उतरवण्यावर भर दिला. समाजातील सोंगटेपणा कमी करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. समाज अधिक सक्षम, सुदृढ आणि सकारात्मक बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. समाजातील कार्यक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता शिक्षणापासून वंचित घटक, आरोग्य सुविधांपासून दूर असलेले नागरिक यांच्यासाठी उपयोगी ठरले पाहिजेत आणि हाच खरा सामाजिक धर्म असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भावसार समाजाच्या इतिहासाचा आढावा घेताना डॉ. डांगरे म्हणाले की, सन १९२५ मध्ये मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी नागपूरमध्ये भावसार समाजाची स्थापना झाली. त्या काळात समाजबांधवांनी संघटित होत शिक्षण, समाजउन्नती आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलली. संघर्षमय परिस्थिती आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भावसार समाजाने शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपली, हे समाजाचे मोठे सामर्थ्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
समारोप सोहळ्याच्या अध्यक्षपदी असलेले महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी भावसार समाजाच्या ऐतिहासिक उगमाची माहिती देत समाजाच्या संस्कृती व मूल्यांवर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे सोमनाथ वाधोणे यांनी आपल्या पूर्वजांनी नागपुरात स्थापन केलेल्या पंचकमेटीचा अभिमान व्यक्त केला. माजी अध्यक्ष देवराव फुलझले यांनी आपल्या कार्यकाळात आलेल्या अडचणींचा उल्लेख करत समाजाला योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा मांडला. दरम्यान समाजाच्या शंभर वर्षपूर्तीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
 
 
यावेळी माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष गोजे यांनी पंचकमेटीच्या कार्याचा सविस्तर लेखाजोखा सादर करत युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. तसेच समाजातील महिलांचा वाढता सहभाग ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. पंचकमेटीचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र अंबारे यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत समाजबांधवांनी संघटित राहून सामाजिक कार्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. या प्रसंगी आजी-माजी अध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांचा संक्षिप्त परिचय कोषाध्यक्ष अशोक बोरघरे यांनी तर डॉ. रविंद्र शोभणे यांचा परिचय शेखर अलोणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेतांबरी गोजे यांनी तर आभारप्रदर्शन कार्याध्यक्ष गजानन साधनकर यांनी केले. या ऐतिहासिक समारोप सोहळ्यास पंचकमेटीचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.