बंडखोरी महागात! भाजपकडून 54 नेत्यांना बाहेरचा रस्ता

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
नाशिक,
BJP shows the door to 54 leaders. नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना भाजपने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी कठोर कारवाई केली आहे. पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या माजी महापौरांसह तब्बल ५४ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिकमधील भाजपच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी शिस्तभंगाची कारवाई मानली जात असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या अनेकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारत अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात थेट मैदानात उतरलेल्या २० माजी नगरसेवकांसह एकूण ५४ जणांवर भाजपने कठोर कारवाई करत त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, या यादीत माजी महापौरांचाही समावेश असल्याने या निर्णयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
BJP
 
 
महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा देत जोरदार तयारी केली होती. त्यासाठी इतर पक्षांतील अनेक प्रभावशाली नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता आणि अनेकांना उमेदवारीचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र १२२ जागांसाठी तब्बल १,०७७ इच्छुकांनी मुलाखती दिल्याने उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत प्रचंड तणाव निर्माण झाला. याच काळात महायुती होणार की नाही, याबाबतही संभ्रम कायम होता. अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केल्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ११८ उमेदवार जाहीर केले. मात्र एबी फॉर्मच्या गोंधळामुळे काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले आणि पक्षातील असंतोष अधिकच वाढला. त्यातच इतर पक्षांतून आलेल्या ३३ जणांना उमेदवारी देण्यात आल्याने जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
 
ही नाराजी इतकी टोकाला गेली की, प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करत शहराध्यक्ष सुनील केदार यांचा घेराव घातला. निषेध म्हणून त्यांना गाजर देण्याचा प्रकारही घडला. पक्षाकडून बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्वांना थांबवण्यात अपयश आल्यानंतर अखेर भाजपने कठोर निर्णय घेत हकालपट्टीची कारवाई केली. या कारवाईबाबत भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले की, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे किंवा अपक्ष तसेच इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारणे हा गंभीर पक्षशिस्तभंग आहे. त्यामुळे अशा सर्वांवर पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईत माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह माजी सभागृह नेते, माजी गटनेते, माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मतदानाच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या निर्णयामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.