ब्रेव्हिसची बॅट शांत; सीएसकेसाठी धोक्याची घंटा

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Brevis's bat was quiet दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या एसए२० देशांतर्गत टी-२० लीगमध्ये खेळणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसच्या खराब फॉर्ममुळे चेन्नई सुपर किंग्जची चिंता वाढली आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळत असलेल्या ब्रेव्हिसची या हंगामातील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्याची बॅट सध्या शांत असल्याचे चित्र असून, तो सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरत आहे. आगामी आयपीएल २०२६ मध्ये तो सीएसकेकडून खेळणार असल्याने त्याचा हा फॉर्म फ्रँचायझीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
 
 

Brevis 
या एसए२० हंगामात डेवाल्ड ब्रेव्हिसने आतापर्यंत आठ सामने खेळले असून सात डावांमध्ये त्याने अवघ्या २० च्या सरासरीने १२० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत त्याला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. या १२० धावांपैकी ७० धावा त्याने आपल्या माजी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सविरुद्ध केल्या, तर उर्वरित ५० धावा इतर संघांविरुद्ध आल्या आहेत. उरलेल्या सामन्यांत तो कामगिरी सुधारतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या ब्रेव्हिसकडून आतापर्यंत एकही निर्णायक खेळी पाहायला मिळालेली नाही.
 
 
याउलट, आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ब्रेव्हिसने चांगली छाप पाडली होती. त्या हंगामात त्याने सहा सामने खेळून ३७.५० च्या सरासरीने २२५ धावा केल्या होत्या. विशेष बाब म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १८० इतका होता आणि त्याने दोन अर्धशतकांची नोंदही केली होती. त्यामुळे सीएसकेला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि तो लवकरात लवकर पुन्हा फॉर्ममध्ये येईल, अशी आशा फ्रँचायझीला आहे.
 
दरम्यान, चालू एसए२० हंगामातील २२ व्या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सने एमआय केपटाऊनवर ५३ धावांनी दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना प्रिटोरिया कॅपिटल्सने २० षटकांत सहा गडी गमावून १८५ धावांचे आव्हान उभे केले. संघाकडून शेरफेन रदरफोर्डने आक्रमक अर्धशतक झळकावत २७ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि पाच षटकारांसह ५३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना एमआय केपटाऊनचा संघ २० षटकांत केवळ १३२ धावांपर्यंत मजल मारू शकला. रीझा हेंड्रिक्सने ५० चेंडूंमध्ये नाबाद ६८ धावा करत एकाकी झुंज दिली, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने संघाचा पराभव झाला.