चंद्रपूर,
chandrapur-municipal-corporation-election : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले प्रभागातील भोंगे एकदाचे वाजणे थांबले. एकापाठोपाठ एक भोंगागाडी सतत सुरू असायची. प्रचाराची ही रणधुमाळी मंगळवार, 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपली. शेवटचा दिवशी महानगरातून विविध पक्षांच्या रॅली आणि सभांनी गाजला. आता उघड प्रचार बंद होवून उमेदवार छुप्या पद्धतीने मतदारांशी संपर्क करतील.
प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर शहरातील बॅनर, फ्लॅक्स, डिजीटल बोर्ड, झेंडे काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी 451 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परवा 15 जानेवारीला मतदान होणार असून, 16 जानेवारीला लगेच उमेदवारांच्या राजकीय भाग्याचा फैसला होणार आहे.
दरम्यान, होवू घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या परिसरात जिल्हाधिकार्यांनी सकाळी 6 ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या 100 मिटर क्षेत्रांतर्गत परिसरात गर्दी होवून सार्वजनिक शांततेस व अन्य हालचालींना प्रतिबंध राहील, या कालावधीत मतदान केंद्राच्या 100 मिटर परिसरातील मोबाईल, सेल्युलर फोन, कार्डलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी स्वयंचलित व दुचाकी वाहन, व्हिडीओ चित्रीकरण, फोटोग्राफी, शस्त्रे इत्यादी सवलतीवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी मतदार कामगारांना सुट्टी
मनपा क्षेत्रातील कामगार मतदारांना 15 जानेवारी रोजी त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक होणार्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणार्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी 2 ते 3 तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घ्यावी. मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाही, अशी तक्रार आल्यास त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.