शक्सगाम खोऱ्यावर चीनचा दावा भारताने फेटाळला!

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
China's claim over the Shaksgam Valley जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्यावर चीनने आपला दावा केला असून, भारताने या दाव्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत हा रस्ता पाकिस्तानकडे जातो, परंतु भारताने या भागात कोणत्याही बेकायदेशीर परदेशी बांधकामांना नेहमी विरोध केला आहे. ९ जानेवारी रोजी भारताने शक्सगाम खोऱ्यातील चीनच्या नियंत्रणाला बेकायदेशीर ताबा असल्याचे स्पष्ट केले.
 
 

China 
परदेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शक्सगाम खोरा हा चीनचा भाग आहे आणि या हद्दीत पायाभूत सुविधा विकसित करणे चीनचा हक्क आहे. त्यांनी १९६० च्या दशकात चीन-पाकिस्तान दरम्यान झालेल्या सीमा कराराचा उल्लेख करत सांगितले की, हा करार दोन्ही देशांच्या सार्वभौम हक्कांतून झाला होता. माओ निंग यांनी सीपीईसी प्रकल्पाबाबत सांगितले की, हा प्रकल्प स्थानिक आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देण्यास तसेच लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आहे आणि काश्मीर मुद्द्यावर चीनची भूमिका तशीच आहे.
 
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ९ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, शक्सगाम खोरा हा भारतीय भूभाग आहे. १९६३ मध्ये चीन-पाकिस्तानने केलेल्या कराराला भारताने कधीही मान्यता दिलेली नाही आणि तो बेकायदेशीर आहे. भारत चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) ला मान्यता देत नाही, कारण हा रस्ता जबरदस्तीने ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागातून जातो. जम्मू, काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि या मुद्द्यावर भारताने चीन आणि पाकिस्तानला अनेकदा स्पष्टपणे सांगितले आहे.
 
सिपीईसी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून २०१३ मध्ये सुरू झाला. हा कॉरिडॉर चीनच्या शिनजियांग प्रांतातून सुरू होऊन पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत पोहोचतो. सुमारे ६० अब्ज डॉलर्स खर्चून हा प्रकल्प विकसित केला जात आहे. या कॉरिडॉरअंतर्गत रस्ते, रेल्वे, बंदरे आणि ऊर्जा प्रकल्प बांधून चीन अरबी समुद्रापर्यंत थेट पोहोच मिळवणार आहे.