जिल्हा परिषद निवडणुकांचा आज वाजणार बिगुल!

दुपारी आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

    दिनांक :13-Jan-2026
Total Views |
मुंबई,
District Council Elections Press Conference महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असून राज्य निवडणूक आयोग आज महत्त्वाची पत्रकार परिषद दुपारी ४ वाजता घेणार आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असलेल्या प्रलंबित १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होऊ शकतो. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी आयोगाला १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास संबंधित १२ जिल्हा परिषदांमध्ये तात्काळ आचारसंहिता लागू होईल. पुणे, सोलापूरसह राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ‘मिनी विधानसभे’सारखी मानली जाणारी ही निवडणूक राजकीय वातावरण तापवणारी ठरणार आहे. आयोगाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी आजच पत्रकार परिषदेत संभाव्य वेळापत्रक समोर येण्याची दाट शक्यता आहे.
 
 
District Council Elections
सूत्रांच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल, तर फेब्रुवारीच्या मध्यात मतदान होण्याची शक्यता आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचेल. या पहिल्या टप्प्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नाही. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने तिथल्या निवडणुकांबाबत अद्याप प्रतीक्षा कायम आहे. नंदुरबार, पालघर, गडचिरोली, नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, नागपूर, ठाणे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचा टक्का जास्त असल्याने या निवडणुका पुढील टप्प्यात घेण्यात येणार आहेत. एकीकडे निवडणूक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, दुसरीकडे मतदानापूर्वी काही ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण होत आहे. डोंबिवलीत पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिंदे गट आमनेसामने आले असून हिंसक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुका केवळ राजकीयच नव्हे तर कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या ठरणार आहेत.