ढाका,
Hindu auto driver murdered in Bangladesh बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेला हिंसाचार थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून, आणखी एका हिंदू तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. फेंगुआ तालुक्यातील डांगभुआ परिसरात समीर दास या तरुणावर अतिरेक्यांनी अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली. हल्ल्यानंतर आरोपींनी त्याचे सामान लुटले आणि घटनास्थळावरून फरार झाले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
समीर कुमार दास हा २८ वर्षांचा तरुण असून तो बॅटरीवर चालणारी ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी रात्री तो नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोध घेऊनही त्याचा काहीच पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात ही हत्या सुनियोजित असल्याचे संकेत मिळत असून, हल्ल्यानंतर आरोपींनी समीरची ऑटोरिक्षाही चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवासी आणि ऑटोरिक्षा चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.