मुंबई,
installment paid before Makar Sankranti राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात मिळणारा हप्ता आता थेट बँक खात्यात जमा होऊ लागला असून, अनेक महिलांना सकाळपासूनच रकमेचे संदेश प्राप्त होत आहेत. निवडणुकीमुळे लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेतून मार्ग काढत, नियमित लाभ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून, या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देता येईल का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की ही योजना आधीपासूनच कार्यरत असल्याने तिचा नियमित हप्ता लाभार्थींना देण्यास हरकत नाही. मात्र, जानेवारी महिन्याचा हप्ता आगाऊ स्वरूपात देण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता सध्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जात आहे.
दरम्यान, मकरसंक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये खात्यात जमा होतील, अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडियावरील दाव्यांमुळे निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांकडे स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू झालेल्या योजना आचारसंहितेच्या काळात सुरू ठेवता येतात, मात्र त्यामध्ये कोणताही नवीन किंवा आगाऊ लाभ देता येत नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयानुसार नवीन लाभार्थी निवडण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे तीन हजार रुपयांचा एकत्रित लाभ देण्याऐवजी केवळ नियमित १५०० रुपये देण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर, मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी राज्यातील कोट्यवधी ‘लाडक्या बहिणीं’च्या बँक खात्यात आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.