वाशीम,
raju bhandurge वाशीम नगर परिषद उपाध्यक्षपदाची निवडणुक १३ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी नप उपाध्यक्षपदी राजू भांदूर्गे यांची तर स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेना उबाठा गटाच्या रेखा सुरेश मापारी, भाजपा पक्षाचे गणेश खंडाळकर, नीलेश जीवणानी यांची अविरोध निवड करण्यात आली. यादरम्यान एमआयएम च्या दोन नगरसेवकांची अनुपस्थिती होती.
याबाबत सविस्तर असे की, वाशीम नगर पालिकेची निवडणुक २० डिसेंबर रोजी पार पडली तर मतमोजणी २१ डिसेंबरला झाली. यामध्ये अध्यक्षपदी भाजपा पक्षाचे अनिल केंदळे हे बहुमताने विजयी झाले. त्यांनी शिवसेना उबाठा गटाच्या रेखा मापारी यांचा बहुमताने पराभव केला. नगर परिषदेच्या १६ प्रभागातील ३२ नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा पक्षाचे १४, शिवसेना उबाठा गटाचे १३, काँग्रेस पक्षाचे २, एमआयएम पक्षाचे २ व एक अपक्ष असे संख्याबळ निवडुन आले. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेली १७ ही संख्या एकाही पक्षाकडे नसल्यामुळे उपाध्यक्ष पदाचा पेच निर्माण झाला होता. ऐनवेळी भाजपा व शिवसेना उबाठा गटाने एकत्र येवून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
आज, १३ जानेवारी रोजी उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यपद निवडीसाठी नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये उपाध्यक्षपदासाठी राजू भांदूर्गे यांचा एकमेव अर्ज आला होता. तसेच स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेना उबाठा गटाच्या रेखा सुरेश मापारी, भाजपा पक्षाचे गणेश खंडाळकर व नीलेश जिवणानी यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सदर निवडणुक अविरोध झाली. यावेळी अविरोध निवडुन आलेले शिवसेना उबाठा गटाचे उपाध्यक्ष राजू भांदूर्गे यांनी शहरातून भव्य मिरवणुक काढत जल्लोष साजरा केला.raju bhandurge भाजपा व शिवसेना उबाठा या पक्षाची नगर परिषदमध्ये सत्ता स्थापन झाल्याने विकासाला चालना मिळणार असल्याची भावना दोन्ही पक्षाच्या नेत्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. निवडणुक अविरोध करण्यासाठी शिवसेना खा. संजय देशमुख, भाजपा आ. श्याम खोडे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, नगराध्यक्ष अनिल केंदळे, भाजपा निवडणुक प्रमुख राजू पाटील राजे यांनी महत्वाची भूमीका बजावली. यावेळी भाजपा, शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांची उपस्थिती होती. निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलेश गायकवाड व त्यांच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.