मॉस्को,
russia-attack-on-ukraine रशिया–युक्रेन युद्धाला चार वर्षे पूर्ण होत असतानाही संघर्ष थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिका सातत्याने प्रयत्न करत असली, तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनच्या नेतृत्वाशी अनेकदा चर्चा केल्या, बैठका घेतल्या, मात्र युद्ध थांबवण्याचा तोडगा निघू शकलेला नाही. उलट, दोन्ही देशांमधील हल्ले अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवल्याने तणाव आणखी वाढला आहे. रशियाकडून रात्रभर युक्रेनवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. या हल्ल्यामुळे युद्ध थांबवण्याचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न सध्या निष्फळ ठरत असल्याचेच स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे. russia-attack-on-ukraine मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारीच्या रात्रीपासून १३ जानेवारीच्या सकाळपर्यंत रशियाने युक्रेनवर व्यापक स्वरूपाचे हल्ले केले. या कारवाईत रशियाने तब्बल २९३ ड्रोन आणि १८ क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनच्या विविध भागांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या या हल्ल्यांनंतर अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला. सध्या युक्रेनमध्ये कडाक्याची थंडी असून, वीज नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. २०२६ या नव्या वर्षातील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
या हल्ल्यानंतर युक्रेनच्या वायुदलाने अधिकृत निवेदन जारी करत तपशील दिला आहे. रशियाकडून डागण्यात आलेल्या २९३ ड्रोनपैकी २४० ड्रोन युक्रेनच्या संरक्षण यंत्रणांनी हवेतच नष्ट केले. russia-attack-on-ukraine तसेच १८ क्षेपणास्त्रांपैकी ७ क्षेपणास्त्रे यशस्वीपणे पाडण्यात आली. वायुदल, मोबाईल फायटर ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट्सने समन्वयाने कारवाई करत रशियाचा हल्ला मोठ्या प्रमाणात अयशस्वी केल्याचे युक्रेनियन सैन्याने सांगितले आहे. तरीही, या हल्ल्यामुळे काही भागांमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. आता रशियाच्या या आक्रमणाला युक्रेन कोणत्या स्वरूपात प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, युद्ध आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.