वाशीम जिल्हा कौशल्य व उद्योजकतेचे केंद्र म्हणून पुढे यावा : आ. श्याम खोडे

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
पी.एम. विश्वकर्मा विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन
 
वाशीम :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून सुरू झालेली 'PM Vishwakarma Yojana' ‘पी.एम. विश्वकर्मा योजना’ ही पारंपरिक कारागिरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारी योजना आहे. आपल्या देशातील कुशल कारागिर हे आत्मनिर्भर भार चे खरे शिल्पकार असून, त्यांच्या कलेला बाजारपेठ मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. वाशीमसारख्या कृषीप्रधान जिल्ह्यात हस्तकला, लघुउद्योग व घरगुती उद्योगांना मोठी संधी आहे. अशा प्रदर्शनांमुळे कारागिरांना थेट ग्राहक मिळतो, मध्यस्थ टळतो आणि त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळतो. या योजनेचा अधिकाधिक लाभ स्थानिक कारागिरांनी घ्यावा, जेणेकरून वाशीम जिल्हा कौशल्य व उद्योजकतेचे केंद्र म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन आ. श्याम खोडे यांनी केले.
 
 
fkdl
 
भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयांतर्गत एमएसएमई विकास कार्यालय, नागपूर यांच्या वतीने स्थानिक उत्पादकांना त्यांच्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची प्रभावी संधी मिळावी यासाठी मन्नासिंह चौक, शुक्रवार पेठ येथील स्वागत लॉनमध्ये तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. 'PM Vishwakarma Yojana' ‘पी.एम. विश्वकर्मा’ प्रदर्शनी व विक्रीचे उद्घाटन आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, एमएसएमई विकास कार्यालय नागपूरचे निदेशक डॉ. व्ही. आर. सिरसाठ, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की, पी. एम. विश्वकर्मा योजना ही केवळ आर्थिक सहाय्याची योजना नसून, कारागिरांना आधुनिकतेशी जोडणारी सर्वसमावेशक विकास योजना आहे. पारंपरिक कौशल्यांना नवीन दिशा देण्याचे कार्य या योजनेतून होते. वाशीम जिल्ह्यातील अनेक कारागिरांमध्ये मोठी गुणवत्ता व नाविन्य दडलेले आहे. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय वाढवावा, रोजगारनिर्मिती करावी आणि आपल्या उत्पादनांना राज्य व देशपातळीवर ओळख मिळवून द्यावी, हीच अपेक्षा आहे. प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे ते म्हणाले.
 
 
बघेल यांनी प्रास्ताविकात 'PM Vishwakarma Yojana' ‘पी.एम. विश्वकर्मा’ योजनेचे महत्त्व विशद करताना सांगितले की, ही योजना पारंपरिक कारागिरांना आर्थिक, तांत्रिक व डिजिटल सक्षमतेकडे घेऊन जाणारी आहे. प्रशिक्षण, स्वस्त कर्ज, आधुनिक साधने आणि बाजारपेठेशी जोडणी यांच्या माध्यमातून कारागिरांना आत्मनिर्भर बनविण्याचा शासनाचा संकल्प या योजनेतून प्रत्यक्षात उतरत आहे. व्ही. आर. सिरसाठ यांनीही पी. एम. विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती दिली. या प्रदर्शनीने जिल्ह्यातील नवउद्योजकांना प्रेरणा देण्याचे काम केले. ग्रामीण व शहरी भागातील लघुउद्योगांना आर्थिक बळकटी देण्यासोबतच स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम असून, ‘स्वदेशी उत्पादनांना बळ, कारागिरांना सन्मान’ ही संकल्पना या निमित्ताने प्रभावीपणे रुजली जाईल.असे प्रतिपादन केले. दरम्यान जिल्हाधिकारी व आ.श्याम खोडे व उपस्थितांनी विविध स्टॉलची पाहणी करून संवाद साधला. कार्यशाळेत नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.