देशभरातील नऊ राज्यांना जोडणार अमृत भारत एक्सप्रेस!

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Amrit Bharat Express will connect nine states भारतीय रेल्वे लवकरच देशातील नऊ राज्यांना जोडणाऱ्या नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक सुविधा आणि देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित या गाड्यांमुळे प्रवाशांना वेगळीच प्रवास अनुभूती मिळणार आहे. ईशान्य भारत, उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत आणि पश्चिम भारत यांना थेट जोडणाऱ्या या गाड्या विविध महत्त्वाच्या शहरांदरम्यान धावतील. यामध्ये एक अमृत भारत एक्सप्रेस आसाममधील गुवाहाटीच्या कामाख्या स्थानकावरून हरियाणातील रोहतककडे धावणार आहे. ही गाडी शुक्रवारी रात्री कामाख्याहून सुटून रविवारी दुपारी रोहतकला पोहोचेल, तर परतीचा प्रवास रविवारी रात्री सुरू होईल.
 

amrutbharat  
दुसरी गाडी आसामच्या दिब्रूगडहून उत्तर प्रदेशातील लखनऊच्या गोमती नगर स्थानकापर्यंत धावणार असून तीही आठवड्यातून एकदा दोन्ही बाजूंनी चालवली जाईल. पूर्व आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मार्गांवरही रेल्वेने भर दिला आहे. पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी आणि तामिळनाडूमधील नागेरकोइल यांच्यात अमृत भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. हा प्रवास जवळपास चार दिवसांचा असून, परतीच्या फेऱ्याही निश्चित वेळापत्रकानुसार असतील. याचबरोबर न्यू जलपाईगुडी ते तिरुचिरापल्ली दरम्यान आणखी एक गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगालमधील अलीपुरद्वार येथून दक्षिणेकडील एसमव्हीटी बेंगळुरू आणि पश्चिमेकडील मुंबई पनवेलपर्यंत दोन वेगळ्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. या गाड्या अनेक राज्यांतून प्रवास करत प्रवाशांना थेट जोडणी देणार आहेत. तसेच कोलकात्याच्या संत्रागाछी स्थानकावरून चेन्नईच्या तांबरमपर्यंत, हावडाहून दिल्लीतील आनंद विहारपर्यंत आणि सियालदाहहून वाराणसीपर्यंतही अमृत भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.
या सर्व गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये वापरलेले तंत्रज्ञान पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे. प्रत्येक अमृत भारत एक्सप्रेसमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यामध्ये स्लीपर, जनरल सेकंड क्लास आणि गार्ड कोचचा समावेश असून सुमारे दीड हजार प्रवाशांची आसन क्षमता असेल. या गाड्या नॉन-एसी असल्या तरी प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक शौचालये, सेन्सरवर चालणारे नळ, अग्निशमन यंत्रणा आणि स्वतंत्र उद्घोषणा प्रणाली देण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअर रॅम्प, आरामदायी आसन व्यवस्था आणि प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट देण्यात आला आहे. मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांचे भाडे थोडे जास्त असणार असले तरी सुविधा आणि प्रवासाचा दर्जा पाहता रेल्वेचा हा नवा उपक्रम प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.