Chandrapur Municipal Corporation Election चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता गुरूवार, 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यात 2 लाख 99 हजार 994 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, 17 प्रभागाच्या 66 जागेसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या 451 उमेदवारांचे भाग्य मशिनबंद होणार आहेत.
Chandrapur Municipal Corporation Election सुरक्षित, सुलभ व आदर्श मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या निवडणुकीत 1 लाख 49 हजार 609 पुरुष, 1 लाख 50 हजार 354 महिला, तर 31 इतर मतदारांचा समावेश असणार आहे. महिला मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या 5 पिंक बूथमध्ये महिला कर्मचारी, सुरक्षित वातावरण, विशेष सजावट व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर, आदर्श बूथ हे स्वच्छता, सुव्यवस्थित रचना, योग्य मार्गदर्शन व आदर्श व्यवस्थापनासाठी ओळखले जाणार आहेत. दरम्यान, मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वाटप बुधवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून करण्यात आले. मतदान कर्मचार्यांसाठी प्रवेश व बाहेर निघण्याची स्वतंत्र व्यवस्था, विविध पथकांची हजेरी नोंद, साहित्य वाटपासाठी स्वतंत्र टेबल्स, संबंधित मतदान बूथची माहिती, पोलिस प्रशासनाची व्यवस्था तसेच मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत 391 पथकांचे एकूण 1564 कर्मचारी त्यांच्या मतदान केंद्रांकडे रवाना झालेत. यावेळी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक विजय भाकरे यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला.