रामटेक,
ramtek-viral-news महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अत्यंत थरारक आणि चमत्कारिक घटना समोर आली आहे. १०३ वर्षांच्या गंगाबाई साखरे या आजींना जन्मदिवसाच्या दिवशी मृत समजून अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, नियतीने वेगळाच खेळ मांडला आणि मृत्यूच्या दारातून त्या पुन्हा एकदा आयुष्यात परतल्या.

सोमवारी सायंकाळी गंगाबाई यांच्या शरीरात कोणतीही हालचाल न दिसल्याने कुटुंबीयांनी त्यांचे निधन झाल्याचे समजले. लगेचच अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नातेवाइकांना संदेश पाठवण्यात आले, शोकमंडप उभारण्यात आला आणि मंगळवारी त्यांना नवी साडी नेसवून, हात-पाय बांधून, नाकात कापसाची रुईही ठेवण्यात आली. सोशल मीडियावरही त्यांच्या निधनाची बातमी पसरली आणि दूरवरचे नातेवाईक रामटेककडे निघाले. ramtek-viral-news मात्र मंगळवारी सायंकाळी एक अनपेक्षित क्षण घडला. आजींच्या नातवाचे, राकेश साखरे यांचे लक्ष अचानक त्यांच्या पायाच्या बोटांच्या हालचालीकडे गेले. क्षणाचाही विलंब न करता नाकातील रुई काढण्यात आली आणि तेवढ्यात गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. मृत समजल्या गेलेल्या आजी जिवंत असल्याचे पाहून संपूर्ण कुटुंब आनंदाने आणि आश्चर्याने थक्क झाले.
क्षणातच घरातील शोकाचे वातावरण आनंदात बदलले. शववाहिनी परत पाठवण्यात आली, शोकमंडप हटवण्यात आला आणि मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतलेल्या गंगाबाई रामटेकसाठी जणू ‘जिवंत चमत्कार’ ठरल्या. विशेष म्हणजे, तोच दिवस त्यांच्या १०३व्या वाढदिवसाचा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर अंत्यसंस्काराऐवजी आनंदाचा उत्सव साजरा झाला. कुटुंबीयांनी केक कापून गंगाबाईंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. ramtek-viral-news अंत्यसंस्कारासाठी आलेले नातेवाईक आणि ग्रामस्थ आनंदाने केक खाऊन परतले. ही विलक्षण घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, आजूबाजूच्या गावांतील लोकही या “मृत्यूला हरवून परतलेल्या” आजींना पाहण्यासाठी भेट देत आहेत.