मुंबई
Fadnavis attack on the Thackeray मुंबईत झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका करत परप्रांतीयांविरोधातील राजकारणावर निशाणा साधला. मराठी माणसाच्या नावावर इतरांना मारहाण करणे म्हणजे विकास नव्हे, असे स्पष्ट करत त्यांनी गेल्या २५ वर्षांत मराठी माणसाला रोजगारासाठी मुंबईबाहेर जावे लागले, हेच अपयश असल्याचे ठणकावून सांगितले. परप्रांतियांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा विकास होत नाही, असा थेट टोला त्यांनी यावेळी लगावला. फडणवीस म्हणाले की, मराठी माणूस कधीही संकुचित नव्हता आणि राहणारही नाही. महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मिता नक्कीच आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याचबरोबर सर्वसमावेशक विकास आणि सुरक्षितता हीच खरी अपेक्षा आहे. मराठी-अमराठी असा भेद निर्माण करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्राची जनता अशा राजकारणाला बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केले की, त्यांचे हिंदुत्व हे संकुचित किंवा केवळ पूजा-पद्धतीपुरते मर्यादित नाही. प्राचीन भारतीय संस्कृती आणि जीवनपद्धती मानणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्या दृष्टीने हिंदू आहे. हिंदुत्व आणि विकास वेगळे होऊ शकत नाहीत, असे सांगत मराठी अस्मिता आणि हिंदू ओळख या एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत, असे त्यांनी ठामपणे मांडले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वरळीतील बीडीडी चाळीला दिलेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी केलेल्या कामाबद्दल रहिवाशांनी त्यांचे आभार मानले. बीडीडी चाळीच्या श्रेयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच फडणवीसांनी थेट चाळीत जाऊन आपली भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबतही मोठा दावा केला. मुंबईसह राज्यातील २६ ते २७ महानगरपालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे महापौर निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवरही महायुतीचा ताबा राहील, असे फडणवीस म्हणाले. ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा “ही युती प्रेमातून नव्हे तर भीतीतून तयार झाली आहे,” असा हल्लाबोल केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष केवळ आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले असल्याचाही आरोप त्यांनी केला. शेवटी, महाराष्ट्राची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ठामपणे उभी आहे आणि त्याच विश्वासावर महायुती निवडणुकांना सामोरी जात आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.