अनिल कांबळे
नागपूर,
Father murdered his daughter : दारु पिऊन मारहाण करणाऱ्या पतीकडे आठ वर्षीय मुलीला साेडून महिलेने दुसऱ्याशी संसार थाटला. घर साेडून गेलेल्या पत्नीने मुलीचा ताबा मागितल्यामुळे चिडलेल्या पतीने मुलीच्या छातीत चाकू भाेसकून खून केला. ही थरारक घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजता वाठाेडा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सराेदेनगरात घडली. धनश्री शेखर शेंदरे (वय 8 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. तर आराेपी शेखर कृष्णराव शेंदरे (46, सराेदेनगर) असे आराेपी पित्याचे नाव आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शेखर शेंदरे हा बांधकाम मजूर असून त्याला दारूचे व्यसन आहे. ताे पत्नी शुभांगी, मुलगी धनश्री, आई कुसुमबाई आणि भाऊ उमेश यांच्यासह राहत हाेता. मात्र, त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय हाेता. त्यामुळे ताे पत्नीला मारहाण करायचा. पतीकडून हाेणाऱ्या मारहाणीला कंटाळून शुभांगीने दाेन वर्षांच्या मुलीला पतीकडे साेडून माहेर गाठले. तेव्हापासून मुलगी धनश्री तिच्या आजीकडे (कुसुमबाई शेंदरे) राहत हाेती. दारुड्या शेखरचे मुलीकडे अजिबात लक्ष नव्हते. धनश्री नुकताच दुसऱ्या वर्गात गेली हाेती. यादरम्यान, शुभांगीच्या आयुष्यात एक युवक आला.
तिने त्या युवकासाेबत संसार थाटला. सध्या तिला एक बाळ आहे. मुलगी धनश्री हिची सासरी हाेणारी परवड बघता शुभांगीला वाईट वाटत हाेते. त्यामुळे तिचाही सांभाळ करण्याचे तिने ठरविले. तिने दुसऱ्या जाेडीदारालाही त्यासाठी तयार केले. शुभांगी वारंवार मुलीचा ताबा मागत हाेती, परंतु शेखरचा त्याला तीव्र विराेध हाेता. बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास याच वादातून शेखरने रागाच्या भरात धनश्रीच्या छातीत चाकू भाेसकून तिचा खून केला. या प्रकरणी मृत धनश्रीची आजी कुसुमबाई शेंदरे (71) यांच्या तक्रारीवरून वाठाेडा पाेलिसांनी आराेपी शेखर याच्यावर गुन्हा दाखल केला. वाठाेडा पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन आराेपी शेखर शेंदरेला अटक केली.
धनश्रीच्या मृतदेहासह आजी ठाण्यात
शेखरने धनश्रीच्या छातीत चाकू भाेसकताच तिने किंकाळी फोडली. नातीच्या किंकाळीने आजीला जाग आली. तिने लगेच धनश्रीकडे धाव घेतली. रक्ताच्या थाराेळ्यात नातीला बघताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. जखमी धनश्रीला घेऊन तिने वाठाेडा पाेलिस ठाणे गाठले. तेथून पाेलिसांनी मेडिकल रुग्णालयात धनश्रीला नेले. मात्र, तिचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला हाेता.
मारुन टाकेल पण तुला देणार नाही...
पत्नी शुभांगी वारंवार मुलीचा ताबा मागत हाेती. मात्र, दुसऱ्याशी घरठाव केल्यामुळे ताे चिडून हाेता. ‘मी मुलीला मारुन टाकेल, पण तुला मुलीचा ताबा देणार नाही,’ अशी धमकी शेखरने शुभांगीला दिली हाेती. त्यानंतर मात्र, त्याने शब्द खरे करुन दाखवत रागाच्या भरात मुलीचा खून केला. या हत्याकांडानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दाेन आठवड्यांतच पाच हत्याकांड
गेले वर्ष हत्याकांडांनी गाजल्यानंतर नव्या वर्षाची सुरूवातही यशाेधरानगर हद्दीतील हत्याकांडाने झाली. यानंतर काही दिवसांत कळमना यानंतर जरीपटका, इमामवाडा आणि आता वाठाेडा येथे हत्याकांड घडले. नव वर्षाच्या अवघ्या दाेन आठवड्यांतच शहरात पाच हत्या झाल्याने पुन्हा कायदा-सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहे.