स्थानिक गुन्हे शाखीची कारवाई
6.46 लाखाचा एवज हस्तगत
गोंदिया :
Gondia 'burglary' case घरफोडी करणार्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. प्रविण अशोक डहाट (30) रा. मोहाडी जि. भंडारा ह. मु. नवेगांवबांध असे मुसक्या आवळण्यात आलेल्या अट्टल आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवार 13 जानेवारी रोजी नवेगावबांध येथे करण्यात आली. अजुग्नी मोरगाव तालुक्यातील ताडगाव टोला येथील मंगेश नरेंद्र कापगते (35) हे 9 जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या घराच्या दाराला कुलुप लाऊन कामासाठी शेतावर गेला. दरम्यान अज्ञात आरोपीने संधी साधून कापगते यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून कपाटातील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. हा प्रकार कापगते शेतावरून घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आला.

Gondia 'burglary' case याप्रकरणी अर्जुनी मोर पोलिस ठाणे येथे मंगेश कापगते यांनी तक्रार केली. पोलिसानी गुन्हा नोंद करून तपासचक्र फिरविले. प्रकरणाचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार करीत असताना 13 जानेवारी रोजी आरोपी संदर्भात गोपनिय माहीती प्राप्त झाली. माहीतीच्या अनुषंगाने आरोपी प्रविण डहाट याच्या नवेगावबांध येथील घरी पथक दाखल होत घराची झडती घेतली. घरासमोरील अंगनात उभ्या असलेल्या दुचाकीची पाहणी केली असता दुचाकीच्या डिक्कीत सोन्याचे दागीने मिळुन आले. त्याबाबत प्रविणला विश्वासात घेत विचारपुस केली असता त्याने 9 जानेवारी रोजी दुपारी ताडगावटोला येथून दागीने चोरी केल्याची कबूली दिली. आरोपी प्रविणकडून 30 हजार किमतीचे सोन्याचे टॉप्स, 1 लाख 56 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, 3 लाख 60 हजाराचे सोन्याचे चपटी लगड, 30 हजार किमतीचे सोन्याचे कानातील झुमके, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 6 लाख 46 हजार 250 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरिक्षक वनिता सायकर, पोलिस हवालदार रियाज शेख, पोलिस शिपाई सुनिल डहाके, संतोष केदार चालक पोलिस शिपाई घनश्याम कुंभलवार यांनी केली.