Mahagaon-Gunj Road महागाव ते गुंज दरम्यानचा डांबरी रस्ता सध्या अक्षरशः गलितगात्र अवस्थेत असून या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ते विकासाचा दावा करणार्या पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस या मार्गावरील पॅचवर्कच्या कामातून समोर आला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर तात्पुरत्या स्वरूपाची ठिगळे लावून केवळ लिपापोती केली जात असून ‘रस्त्यात खड्डे आहेत की संपूर्ण रस्ताच खड्ड्यात आहे’ असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. हा रस्ता नव्याने दर्जेदार पद्धतीने बांधण्याची नितांत गरज असताना, दरवर्षी पॅचवर्कच्या नावाखाली शासनाच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
या मार्गावर अत्यंत सुमार दर्जाचे डांबर, गिट्टी व चुरी वापरून ‘पैसा वाचवा, पैसा जिरवा’ हा एककलमी कार्यक‘म राबवला जात असल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहिल्यानंतर ठेकेदार अभियंत्यांचे उघड संगनमत असल्याचे दिसून येते. गुंज ते फुलसावंगी या सुमारे २० किलोमीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचे पॅचवर्क कंत्राट मंजूर करून घेण्यात आले.
यात ठराविक कंत्राटदारांना पोसण्यासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी हा सर्व घाट घातला गेल्याचा आरोप होत आहे. २०१९ पासून हा रस्ता प्रवासायोग्य राहिलेला नाही. परिणामी खाजगी वाहतूक महागाव-खडका-शिरपूर या पर्यायी मार्गाने वळवावी लागत आहे. वापरात नसलेल्या रस्त्यावर दरवर्षी पॅचेसच्या नावाखाली लाखो रुपये हडप करण्याचा धंदा सुरू असून या संपूर्ण ‘गौडबंगालाची’ उच्चस्तर चौकशी करून दोषींना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.
Mahagaon-Gunj Road शाखा अभियंता मयूर वंजारी यांनी आपली बाजू मांडताना, या संदर्भात आम्ही सिमेंट काँक्रीट करण्यासाठी वारंवार प्रस्ताव दिलेला आहे. तसेच विद्यमान आमदार किसन वानखेडे यांना सुद्धा प्रस्ताव पाठविला आहे, परंतु तो अद्याप प्रलंबित आहे, असे सांगितले. शासकीय यंत्रणेच्या या दिरंगाईमुळे आणि निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी लवकरच तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.