माणगावातील कारचालक हत्या प्रकरण उघड; पसार तिघांना बाणेर पोलिसांनी अटक

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
पुणे,
mangaon-car-driver-murder-case : रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात एका कारचालकाचा खून करून पसार झालेल्या तिघा आरोपींना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत महेश वाघमारे (वय २६, रा. लक्ष्मी विहार अपार्टमेंट, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड), तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे (वय २४, रा. सुशील गंगा अपार्टमेंट, कर्वेनगर) आणि ओंकार विजय केंजळे (रा. पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
 

PUNE 
 
 
आरोपींनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एका कारचालकाचा खून करून त्याची कार घेऊन पलायन केले होते. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बाणेर पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रीतम निकाळजे हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गस्त घालत असताना ननावरे पुलाजवळ एक संशयास्पद व्यक्ती कार विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अनिकेत वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून संबंधित कार जप्त करण्यात आली. सखोल चौकशीदरम्यान वाघमारे याने साथीदार तुषार पाटोळे आणि ओंकार केंजळे यांच्यासह माणगाव परिसरात कारचालकाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित दोन्ही आरोपींनाही ताब्यात घेतले.
 
अटक करण्यात आलेल्या तिघांनाही पुढील कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त चिरूमुला रजनीकांत आणि सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक कैलास डाबेराव यांच्यासह बाणेर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.