नागपूर,
arunoday-sickle-cell-campaign : सिकलसेल हा अनुवांशिक रक्तदोष असला तरी योग्य वेळी तपासणी, समुपदेशन आणि व्यापक जनजागृतीद्वारे हा आजार भावी पिढीत जाण्यापासून रोखता येऊ शकतो. याच उद्देशाने नागपूर जिल्ह्यात ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया’ हे व्यापक आणि लक्ष केंद्रीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ० ते ४० वयोगटातील नागरिकांची मोफत तपासणी, उपचार तसेच सिकलसेलविषयी सविस्तर जनजागृती केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नियंत्रणाखाली हे अभियान राबवले जाणार असून, जिल्हा आरोग्य यंत्रणा यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मोहिमेदरम्यान संशयित रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून, अत्यंत अचूक मानली जाणारी ‘एचपीएलसी’ चाचणी, मोफत औषधोपचार तसेच विवाहपूर्व व प्रसूतीपूर्व समुपदेशनावर विशेष भर दिला जाणार आहे.
भावी पिढी सिकलसेलमुक्त राहावी यासाठी विवाहापूर्वी तरुण-तरुणींनी सिकलसेल तपासणी करून आपली ‘सिकलसेल कुंडली’ जुळवावी, असे स्पष्ट आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. चुकीची माहिती, अज्ञान किंवा दुर्लक्षामुळे हा आजार पुढे जातो आणि त्याची साखळी तुटावी, हाच या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचवण्यासाठी गोंडीसह इतर स्थानिक बोलीभाषांमध्ये जनजागृती संदेश, ऑडिओ क्लिप्स, बॅनर्स आणि फलकांचा वापर करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि आश्रमशाळांमध्ये प्रभातफेरी, प्रश्नमंजुषा, रांगोळी व निबंध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनाही या मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर दवंडी व मायकिंगद्वारेही नागरिकांना सिकलसेलबाबत माहिती दिली जाणार आहे.
मोहिमेच्या कालावधीत होणाऱ्या स्थानिक सण, यात्रा आणि धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी विशेष स्क्रीनिंग स्टॉल्स उभारण्यात येणार असून, नागरिकांची जागेवरच तपासणी केली जाणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, एएनएम आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सिकलसेलबाबत जनजागृती केली जाणार आहे. या अभियानात लोकप्रतिनिधी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.