मतदानाच्या दिवशी सुटी सक्तीची; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
पिंपरी,
PMC Elections 2026 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी गुरुवारी (दि. १५) जिल्ह्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. असे असतानाही काही खासगी कंपन्या, कारखाने आणि आस्थापनांनी कामकाज सुरू ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे.
 
 
PUNE
 
 
 
मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांप्रमाणेच खासगी आस्थापनांनाही सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे. औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, निवासी हॉटेल्स, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, कारखाने तसेच अन्य खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी देणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुटी देणे शक्य नसल्यास, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची सवलत देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
कोणतीही कंपनी किंवा आस्थापना मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी न देता कामावर बोलावत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी अपर कामगार आयुक्त कार्यालय किंवा कामगार उपायुक्त कार्यालयाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी केले आहे. मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांवर दबाव येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.