गोंदिया जिल्ह्यात ६८ हजार ‘एकल’ महिलांचा जगण्यासाठी संघर्ष !
दिनांक :14-Jan-2026
Total Views |
५४ हजारांच्यावर एकल महिलांना शासनाचा आधार
प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया :
'Single Women Survey' परिस्थितीने ओढावलेला एकाकीपणा किंवा संसाराचा गाडा ओढताना पतीचा हरवलेला आधार यामुळे एकाकी जीवन जगत असलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधार दिले जाते. असे असले एकाकी पडलेल्या महिलांना जगण्यासाठी आर्थिक व सामाजिक स्तरावर संघर्ष करावा लागतो. दरम्यान, महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात एकाकी पडलेल्या महिलांची आकडेवारी पुढे आली असून एकट्या गोंदिया जिल्ह्यात ६८ हजार ९ एकल महिला एकाकी जीवन जगत असल्याचे वास्तव आहे. यापैकी ५४ हजार १२८ एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे.
'Single Women Survey' शासनाच्या मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने १ ते १३ जानेवारीदरम्यान शहरी व ग्रामीण अशा १९०२ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता अशा एकल महिलांचा सर्वेेक्षण करण्यात आला. ज्यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ४९७ कुमारी, १ हजार ५०६ घटस्फोटीत, १ हजार ३०० परित्यक्ता तर ६३ हजार ७०६ विधवा एकल महिलांच्या संघर्षाचे चित्र पुढे आले आहे. यात ३० वर्षे वयोगटापर्यंतच्या ०.७५ टक्के विधवा महिला असून ३१ ते ४० वयोगटातील ५.५० टक्के, ४१ ते ५० वयोगटात १४.५० टक्के ५१ ते ६५ वयोगटात ३९ टक्के तर ६५ वयोगटावरील ४०.२५ टक्के विधवा महिलांचा समावेश आहे. तर याच सर्वेक्षणात जिल्ह्यात ३ हजार ३१ दिव्यांग महिला असल्याचेही दिसून आले आहे.