व्हायरल व्हिडिओमुळे ट्रम्प अडचणीत; नव्या वादाला तोंड

    दिनांक :14-Jan-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump in trouble due to viral video अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, त्यावरून अमेरिकन राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मिशिगन राज्यातील डेट्रॉईट येथे असलेल्या फोर्ड एफ-१५० ऑटोमोबाईल कारखान्याला दिलेल्या भेटीदरम्यान ट्रम्प कॅमेऱ्यात आक्रमक वर्तन करताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे.
 
trump shows middle finger
 
मंगळवारी झालेल्या या भेटीत ट्रम्प लांब काळा ओव्हरकोट परिधान करून कारखान्याच्या मजल्यावर नजर ठेवणाऱ्या उंच प्लॅटफॉर्मवर उभे होते. यावेळी खाली उभ्या असलेल्या एका कामगाराकडून जोरात काही घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर ट्रम्प संतप्त झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यांनी त्या कामगाराकडे बोट दाखवत रागाने काही शब्द उच्चारले आणि क्षणातच मधले बोट दाखवत प्रतिक्रिया दिली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. संबंधित कामगाराची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र व्हाईट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्षांची बाजू घेतली. त्यांनी सांगितले की एक व्यक्ती आक्रमकपणे आणि असभ्य भाषेत ओरडत होती आणि राष्ट्राध्यक्षांनी त्याला योग्य उत्तर दिले. टीएमझेडच्या वृत्तानुसार, त्या कामगाराने ट्रम्प यांच्याकडे उद्देशून “बाल लैंगिक शोषण करणारा” अशी आरोळी ठोकली होती. ही टिप्पणी कुख्यात फायनान्सर जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
जेफ्री एपस्टाईन प्रकरण अमेरिकेत अजूनही अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त मानले जाते. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीच्या आरोपांखाली एपस्टाईनवर खटला सुरू असतानाच २०१९ मध्ये न्यूयॉर्कमधील तुरुंगात त्याचा मृत्यू झाला होता. अधिकृतरीत्या हा मृत्यू आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आला असला तरी आजही अनेक जण त्यामागे संशय व्यक्त करत आहेत. एपस्टाईन एकेकाळी ट्रम्प तसेच अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात होता, यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.