वेध
गिरीश शेरेकर
kingmaker of amravati अमरावती महापालिकेच्या 22 प्रभागांच्या 87 जागांसाठी गुरुवार 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठीचा जाहीर प्रचार मंगळवारी थांबला. या निवडणुकीत सुरुवातीला युती व आघाडीच्या चर्चा झाल्या. शेवटपर्यंत चर्चांच्या फेèया सुरू होत्या. अखेर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन प्रचार सुरू केला. पक्ष व अपक्ष असे एकूण 661 उमेदवार रिंगणात आहेत. दहा दिवस जोरदार प्रचार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापासून भाजपाचे अनेक मंत्री, नेते तसेच इतर पक्षांचे नेतेही प्रचारात सहभागी झाले होते. आरोप-प्रत्यारोप झाले. आता नेमकी वेळ जवळ आली आहे. अमरावती महापालिका हद्दीतल्या मतदारांच्या मनात काय आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार असले तरी अनेक अंदाज वर्तविले जात आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभागनिहाय वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळत आहेत. ज्याला जे समजते ते भाकीत सांगितले जात असून नेमका अंदाज काढणे अवघड झाले आहे.
अमरावतीत त्रिशंकू स्थितीची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत महापालिकेचा किंगमेकर कोण होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर गेल्या 15 दिवसांत तयार झालेल्या समीकरणात ते दडले आहे. भाजपाने 2017 मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. यंदाही भाजपाची सत्ता स्थापन व्हावी म्हणून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. पण, पहिले शिवसेना आणि नंतर युवा स्वाभिमान पार्टीसोबत भाजपाचा युतीचा घोळ शेवटपर्यंत कायम राहिल्याने उमेदवार निश्चितीवर काही प्रभागांत परिणाम झाला. शेवटी भाजपाने युवा स्वाभिमानसाठी ज्या प्रभागांत जागा सोडल्या होत्या, तेथे अपक्षांना पाठिंबा देऊन युती संपुष्टात आणली. प्रचारा दरम्यानही भाजपा व युवा स्वाभिमान पार्टीच्या नेत्यांचे शीतयुद्ध चांगलेच रंगले. या दोन्ही पक्षांचा दुवा असलेल्या भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्या विलासनगर - मोरबाग प्रभागातल्या कृतीची दखल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा घेतली. स्थानिक भाजपा नेत्यांच्या तर ती खूपच जिव्हारी लागली. तेथून वातावरण तापले आणि संभ्रम निर्माण झाला. याचा फटका किती प्रमाणात कोणाला बसेल हे वेळच सांगणार आहे. कोणी कोणाला अंधारात ठेवले माहिती नाही पण, दगाफटका झाला आहे. चार ते पाच प्रभागांत भाजपा व युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांतच लढत होत असल्याचे चित्र आहे. भाजपाकडून ते बदलविण्याचे आणि स्वाभिमानकडून ते तसेच कायम ठेवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. कोणाला यश मिळते, हे निकालातून कळेलच! या स्थितीत जर युवा स्वाभिमानला 8 ते 10 जागा मिळाल्या तर ते किंगमेकर होण्याची शक्यता दिसत असून भाजपाची घोडदौड 30 ते 35 जागांवर थांबू शकते. आमदार रवी राणा यांनाही असे वाटत असेल की भाजपा आपल्यावर अवलंबून राहावी. पण, भाजपाला ते नको आहे. राजकीय स्वार्थ म्हणून दोघेही आपल्या जागेवर बरोबर आहे. तसे पाहिले तर राणा ‘कलाकार’ आहेत. निकाल जर त्यांच्या मनासारखा आला तर ते सर्वांच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन अनेकांना धक्का देणारा निर्णय घेऊ शकतात. यासाठी त्यांना नवनीत राणा यांचे बळ मिळेल. वेळ आल्यावर सर्व काही स्पष्ट होईलच.
एक दुसरी स्थिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आहे. या पक्षाच्या 10 ते 12 जागा येण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपासोबत हा पक्ष आहे. भाजपातला स्थानिक नेत्यांचा निर्णय प्रक्रियेतला जो गट आहे, त्यांना निकालानंतर जर काही वेगळी स्थिती निर्माण झालीच तर युवा स्वाभिमानपेक्षा राष्ट्रवादीसोबत जाणे आवडणारे आहे.kingmaker of amravati (एका अर्थांने त्यांना राणापेक्षा खोडके किंगमेकर झाले तर चालते) वर म्हटल्याप्रमाणे रवी राणा यांनी धक्कातंत्राचा वापर केला तर? फार विचार करण्याची गरजच उरत नाही. एक तिसरी स्थिती म्हणजे पाच ते सहा जागा मिळाल्या तर शिवसेना एक पर्याय भाजपाकडे आहेच. हा पर्यायही तसा सोईचाच आहे. राजकारणात काहीपण होऊ शकते. कोणाला किती जागा मिळतात, यावरच गणित आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि युवा स्वाभिमानची डोकेदुखी नकोच, आपले स्वतंत्रच बरे असे भाजपाला मनोमन वाटते. त्यासाठीच भाजपाने इतक्या गोट्या फिरवल्या पण तसे होईल का? दुसèया बाजूने काँग्रेस स्वतंत्रपणे किल्ला लढवत आहे. गत निवडणुकी इतक्या जागा कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या मुस्लिमबहुल भागातल्या उमेदवारांपुढे अन्य पक्षांचे तगडे आव्हान आहे. उबाठा व अन्य छोट्या पक्षाने उमेदवार दिले आहेत. त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. मविआपेक्षा युतीचीच सत्ता बसण्याचा अंदाज अनेकांकडून वर्तविला जात आहे. फक्त समीकरण कसे तयार होते, हेच पाहायचे आहे.
9420721225