लेह,
Young man missing in Ladakh लडाखमधील पँगोंग तलाव परिसरात उत्तर प्रदेशातील चार तरुण पर्यटक अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. हे चौघेही आग्रा येथील रहिवासी असून पर्यटनासाठी लेह-लडाखला गेले होते. त्यांचा शेवटचा ठावठिकाणा पँगोंग तलावाजवळ असल्याचे समोर आले आहे. लडाख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणांची नावे जयवीर चौधरी (२७), शुदांशू फौजदार (२५), यश मित्तल (२५) आणि शिवम चौधरी (२६) अशी आहेत. हे सर्व मित्र एकाच गटात प्रवास करत होते आणि हिरव्या रंगाच्या सेल्टोस कारमधून पँगोंग तलावाच्या दिशेने गेले होते. ९ जानेवारी रोजी कुटुंबीयांशी त्यांचा शेवटचा संपर्क झाला, त्यानंतर मात्र त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही.
चारही तरुणांचे पालक चिंतेत असून त्यांनी ११ जानेवारी रोजी आग्रा येथील सदर पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल केली. त्यानंतर लडाख पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची नोंद करून परिसरातील पर्यटकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.
लडाख पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पँगोंग तलाव परिसरातील हवामान आणि भौगोलिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे. जानेवारी महिन्यात येथे तापमान गोठणबिंदूपेक्षा खूप खाली जाते. पँगोंग तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे ४,२५० मीटर उंचीवर असून, तेथे पोहोचण्यासाठी चांग ला खिंड ओलांडावी लागते, जी सुमारे ५,३६० मीटर उंच आहे. त्यामुळे या भागात प्रवास करताना धोका वाढतो. दरम्यान, या प्रकरणावर लष्कराकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र, पोलिस आणि संबंधित यंत्रणा मिळून चौघांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पँगोंग तलावाला ‘थ्री इडियट्स’ चित्रपटानंतर मोठी ओळख मिळाली असली, तरी हिवाळ्यातील कठोर परिस्थिती पर्यटकांसाठी धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.