झगमगाटात हरविलेले लग्न

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
 
वेध
नंदकिशोर काथवटे
9922999588
 
marriage lost in the blaze आज लग्न लावून घेताना कुणी विचारत नाही की मुलगा माणूस म्हणून कसा आहे. तो संकटात उभा राहील का, जबाबदारी ओळखतो का, नात्यांना जपतो का-हे प्रश्न आता जुन्या वहीत बंद झाले आहेत. आजचा पहिला प्रश्न असतो, कुठली गाडी आहे? ब्रँड महत्त्वाचा असतो, माणूस नाही. चारचाकी जितकी मोठी, तितकी स्थळाची ‘किंमत’ जास्त! लग्न म्हणजे आयुष्यभराचा निर्णय राहिलेला नाही, तो केवळ एक व्यवहार झाला आहे. मुलीबाबतही परिस्थिती वेगळी नाही. तिचा स्वभाव, तिची सहनशीलता, समजूतदारपणा, आयुष्यातील चढ-उतार पेलण्याची क्षमता या गोष्टींची चौकशी फारशी कोणी करत नाही. उलट चर्चा होते ती लग्नात तिने कोणत्या डिझायनरचा ड्रेस घातला, रिसेप्शनसाठी बँक्वेट हॉल किती महाग होता, एन्ट्री किती ‘ग्रँड’ होती याची. मुलगी व्यक्ती म्हणून पाहिली जात नाही, ती पॅकेज म्हणून मांडली जाते. प्री-मॅरेज फोटोशूट हा तर विवाह व्यवस्थेचा आत्मा बनला आहे. दोन माणसं एकमेकांना खरंच ओळखण्याआधीच कॅमेऱ्यासमोर प्रेमाचा अभिनय करतात. डोंगर-दऱ्या, समुद्रकिनारे, किल्ले, रिसॉर्ट्स-पृष्ठभूमी भव्य असते, मात्र त्या फ्रेममध्ये भावनिक खोली मात्र नसते.
 
 

merrage  
 
 
फोटोमध्ये हास्य असतं, पण आयुष्यातील वास्तवाशी सामना करण्याची तयारी नसते. कॅमेऱ्यासाठी उभं राहणं सोपं असतं, संसारासाठी उभं राहणं कठीण असतं हे कुणी सांगत नाही. लग्न आता संस्कार राहिलेला नाही, तो एक इव्हेंट मॅनेजमेंट प्रोजेक्ट झाला आहे. किती पाहुणे, किती प्लेट्स, किती लाईट्स, किती ड्रोन शॉट्स-यावर लक्ष असतं. पण दोन कुटुंबं मानसिकदृष्ट्या जोडली जात आहेत का, दोन माणसं एकमेकांच्या त्रुटी स्वीकारायला तयार आहेत का, याचा विचारच होत नाही. लग्नानंतर टिकणारा संसार महत्त्वाचा नसून, लग्नाच्या दिवशी सोशल मीडियावर किती लाइक मिळाले याला जास्त किंमत आहे. या सगळ्याची किंमत कोण चुकवतं? मध्यमवर्गीय आई-वडील. लोक काय म्हणतील या भीतीपोटी कर्ज काढलं जातं, बचत संपवली जाते. आयुष्यभर साठवलेली पुंजी दोन दिवसांच्या दिखाव्यासाठी उधळली जाते. आणि लोक? लोक दोन दिवस पाहतात, फोटो बघतात, टीका-तुलना करतात आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातात. उरते ती कर्जाची पावती, ताणलेले नातेसंबंध आणि मानसिक थकवा. आज लग्नात आवाज इतका मोठा असतो की संवाद ऐकू येत नाही. संगीत कर्कश आहे, पण समजूतदारपणाचा सूर हरवलेला आहे. आणि मग काही महिन्यांतच तीच जोडपी वाद, गैरसमज आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली जातात. घटस्फोटाचे आकडे वाढतात, नात्यांवरचा विश्वास ढासळतो. कारण लग्नाआधी भूमिका शिकवली गेली होती, जबाबदारी नाही. शहरी लग्नांत दिखाव्याची चढाओढ आहे, तर ग्रामीण भागात त्याची नक्कल सुरू झाली आहे. शहरातील झगमगाट गावात उतरतोय, पण शहरात असलेली आर्थिक क्षमता मात्र गावाकडे आलेली नाही. तरीही गावातील शेतकरी, मजूर, लहान व्यावसायिक आपल्या ऐपतीपलीकडे जाऊन लग्न करतात. कारण शहरातल्या नातलगांनी, सोशल मीडियाने आणि ‘स्टेटस’च्या कल्पनेने गावालाही संक्रमित केलं आहे. पूर्वी गावात लग्न म्हणजे साधेपणा, आपुलकी आणि सामूहिक जबाबदारी होती. आज तिथेही डीजे, आतषबाजी, महागडे ड्रेस आले आहेत. पण त्याबरोबर कर्ज, ताण आणि मतभेदही आले आहेत. ग्रामीण भागात एकेकाळी मुलगा शेतात कसा राबतो, समाजात कसा वागतो, व्यसनमुक्त आहे का, यावर लग्न ठरत असे. मुलगी घर सांभाळेल का, संकटात कुटुंब सोडणार नाही ना, याकडे पाहिलं जात असे.marriage lost in the blaze आज ते निकषही बदललेत. मुलगा बाहेरगावी नोकरीला आहे का?, लग्नात किती लोक येणार?, व्हिडिओ शूटिंग कोण करतो? हे प्रश्न पुढे आलेत. परिणामी शहरासारखेच ताण ग्रामीण संसारातही शिरले आहेत. विवाह व्यवस्था ही समाजाची कणा असते. तीच जर दिखाव्याच्या ओझ्याखाली मोडत असेल, तर परिणाम फक्त दोन व्यक्तींवर नाही, तर संपूर्ण समाजावर होतात. नाती तुटतात, कुटुंबव्यवस्था कमकुवत होते, आणि माणूस एकटा पडतो-फोटो, अल्बममध्ये हसत असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात तो आतून रिकामा असतो. आता तरी हे थांबायला हवं. लग्न पुन्हा माणसांसाठी व्हायला हवं, कॅमेऱ्यासाठी नाही. ड्रेस, हॉल, गाडीपेक्षा स्वभाव, संस्कार आणि समजूतदारपणाला महत्त्व मिळायला हवं. नाहीतर आपल्याकडे सुंदर फोटो असतील, भव्य व्हिडिओ असतील पण टिकणारा संसार मात्र नसेल. आणि तेच या काळाचं सर्वात मोठं अपयश असेल.